जळगावात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; २.३१ लाखांचा साठा जप्त..

जळगाव : अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाई करत भेसळीचा संशय असलेले तसेच मानकांबाह्य अन्नपदार्थ आणि शीतपेयांचा सुमारे २ लाख ३१ हजार ६६० रुपयांचा साठा जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ३ जून रोजी पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील बांबरुळ फाटा परिसरातील एका उत्पादक पेढीची तपासणी करण्यात आली. यावेळी उत्पादित लस्सीच्या पॅकेटवर उत्पादन दिनांक व समूह क्रमांक नमूद नसल्याचे आढळून आले. तसेच भेसळीचा संशय निर्माण झाल्याने लस्सीचा नमुना विश्लेषणासाठी घेण्यात आला. कारवाईदरम्यान २०० मिली क्षमतेची ७५० पॅकेट्स (किंमत २२,५०० रुपये) जप्त करण्यात आली.

त्यानंतर एमआयडीसी, जळगाव येथील फरसाण उत्पादक पेढीवर कारवाई करण्यात आली. तपासणीत उत्पादन प्रक्रियेमध्ये अस्वच्छता तसेच पुन्हा-पुन्हा वापरलेल्या खाद्यतेलाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी वापरलेल्या तेलासह जाड व बारीक रतलामी शेवचे नमुने तपासणीसाठी घेतले. तसेच १४.९ किलो रतलामी शेव (किंमत ७,०८० रुपये) जप्त करण्यात आली.
दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड रोड परिसरात खुल्या स्वरूपात विक्री होणाऱ्या रिफाइन्ड सोयाबीन तेलावरही कारवाई करण्यात आली. पॅकिंगशिवाय खाद्यतेल विक्री होत असल्याचे आढळून आल्यानंतर नमुना तपासणीसाठी घेण्यात आला आणि ३५८ किलो खाद्यतेलाचा ५७,२८० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात उत्पादकापर्यंत चौकशी सुरू असून संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर ४ जून रोजी एमआयडीसी, जळगाव येथील शीतपेय विक्रेता व वितरकाची तपासणी करण्यात आली. ‘ब्लॅक बगीरा’ या कॅफिनयुक्त कार्बोनेटेड शीतपेयामध्ये लेबलिंगसंदर्भातील त्रुटी व मानकांनुसार नसल्याचा संशय आढळल्याने नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. तसेच २०० मिली क्षमतेच्या ७,४४० बाटल्यांचा १ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित उत्पादन बाजारातून परत मागविण्याबाबत उत्पादकास नोटीस बजावण्यात आली असून पुरवठादार व उत्पादकांविरोधात पुढील कारवाईसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) संतोष कांबळे, दीनानाथ शिंदे तसेच अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, किशोर साळुंके, योगराज सूर्यवंशी आणि अमोल जगताप यांनी केली.
दरम्यान, जिल्ह्यात कुठेही भेसळीचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.