तालुका पोलिसांची धडक कारवाई : चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना अवघ्या २ तासांत अटक..

जळगाव | तालुका पोलिसांनी तत्परता दाखवत चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्या ४ अट्टल गुन्हेगारांना अवघ्या दोन तासांत अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ जून २०२६ रोजी पहाटे १:३० ते ३:४५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी चेतन प्रकाश पाटील (वय ३५, रा. खाट नगर, जळगाव) हे त्यांच्या मित्रांसह मोटारसायकलने जळगाव–पाळधी रोडने प्रवास करत होते. त्यावेळी हॉटेल साई गार्डन व हॉटेल राधिका परिसरात चार आरोपींनी त्यांची मोटारसायकल अडवली.
आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना चाकूचा धाक दाखवत मारहाण केली, शिवीगाळ व दमदाटी करत त्यांच्या खिशातील ७,८०० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. तसेच मोटारसायकलीची तोडफोड करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. १७८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(८), १२६, ११५(२), ३५१(२), ३५२, ३२८(४), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांची जलद कारवाई
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी डीबी पथकाला तातडीने तपासासाठी रवाना केले. गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २ तासांत आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्यांची नावे
चेतन उर्फ बटाटा रमेश सुशीर (वय २१, संत मिराबाई नगर, जळगाव) – हिस्ट्रीशीटर, पूर्वी गंभीर गुन्हे दाखल.
उमाकांत दत्तात्रेय जाधव (संत मिराबाई नगर, जळगाव) – सराईत गुन्हेगार, तडीपार कारवाई झालेली.
गौरव मंजय जाधव (वय २१, साई नगर, जळगाव)
रोशन भगवान पाटील (वय २६, पांडुरंग नगर, जळगाव)
या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सहभाग घेतला.