हतनूर धरणाचे ४१ पैकी ४ गेट पूर्ण तर ३२ गेट २ मीटरने उघडले : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा.

जळगाव, दि. ३१ : हतनूर धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक झपाट्याने वाढली असून तापी नदीला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सध्या धरणाच्या ४१ पैकी ४ गेट पूर्णपणे उघडण्यात आले असून ३२ गेट दोन मीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीपात्रात सध्या १,८५,८२८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मात्र, परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून पुढील काही तासांत हतनूर धरणातून ३.५० लाख ते ३.७५ लाख क्यूसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासन आणि जळगाव पाटबंधारे विभागाने तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना नदीपात्रात किंवा पूरप्रवण भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.