गौताळा अभयारण्यात अवैध वृक्षतोड : ६१ लाकडी बल्ल्या जप्त,तीन संशयित ताब्यात..

चाळीसगाव : गौताळा अभयारण्यातील चाळीसगाव वनपरिक्षेत्रात जिवंत झाडांची कथित अवैध तोड करून लाकडाची वाहतूक केल्याच्या प्रकरणात वन विभाग पथकाने कारवाई केली. या कारवाईत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून सागवानाच्या ४ आणि अंजनाच्या ५७ अशा एकूण ६१ लाकडी बल्ल्या, तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली.

CCCAला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर संघटनेच्या पथकाने वरिष्ठ वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर सलग पाच दिवस माहितीची पडताळणी तसेच संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. माहितीची खातरजमा झाल्यानंतर वन विभागाच्या समन्वयाने कारवाई करण्यात आल्याचे CCCAच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात गोकुळ आनंदा गोपाळ (४०), अरविंद विजय जाधव (२०) आणि निलेश एकनाथ राठोड (२५), तिघेही रा. बोढरा, यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम, १९२७ मधील संबंधित कलमे तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तिघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची वन कोठडी मंजूर करण्यात आल्याचेही नमूद आहे.
तस्करीची साखळी तपासण्याची मागणी
दरम्यान, अभयारण्यात जिवंत झाडांची तोड झाल्याचा दावा करत CCCAने तपास केवळ ताब्यात घेतलेल्या व्यक्तींपुरता मर्यादित न ठेवता कथित लाकूड तस्करीच्या संपूर्ण साखळीपर्यंत नेण्याची मागणी केली आहे. झाडे नेमक्या कोणत्या भागातून तोडण्यात आली, तोडणी व वाहतुकीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या प्रकरणामागे मोठे नेटवर्क आहे का, याचा तपास करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
तसेच ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या मोबाईलमधील मागील सहा महिन्यांचा CDR, WhatsApp कॉल व चॅटची कायदेशीर पद्धतीने तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या तपासातून यापूर्वीच्या वन गुन्ह्यांशी संबंधित माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचा दावा CCCAने केला आहे.
दोषी आढळल्यास कारवाईची मागणी
या प्रकरणात कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर आरोप करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट करत, वनसंपदेच्या कथित तस्करीत कोणत्याही व्यक्तीचा अथवा शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्याचा सहभाग आढळल्यास निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी CCCAने केली आहे. तसेच न्यायालयात सादर करण्यात येणारी कागदपत्रे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक तपासावीत, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
गौताळा अभयारण्य हे वन्यजीवांच्या अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे क्षेत्र असल्याने ६१ लाकडी बल्ल्यांच्या जप्तीनंतर आता या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचतो आणि अवैध वृक्षतोडीमागे आणखी कोणाचा सहभाग समोर येतो का, याकडे वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.