यावल

मनुदेवी नवरात्रोत्सवासाठी यावल आगाराच्या १५ बसेस : १५ ऑक्टोबरपासून मंदिराकडे खासगी वाहनांना प्रवेशबंदी..

मनापुरीजवळ पार्किंगची व्यवस्था

यावल (प्रतिनिधी) : खान्देशातील भाविकांचे कुलदैवत आणि जळगाव जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्रीक्षेत्र आई मनुदेवी मंदिराचा नवरात्रोत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून वाहतूक, सुरक्षा, आरोग्य तसेच एसटी बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी ७ ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिराच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला यावल आगार व्यवस्थापक इम्रान खान पठाण, किनगाव मंडळ अधिकारी सलमान तडवी, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना निकम, आडगाव ग्रामसेविका कविता बाविस्कर, सरपंच अमिना तडवी यांच्यासह मनुदेवी संस्थेचे पदाधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.मनुदेवी नवरात्रोत्सवात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. विशेषतः महिला भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसह सर्व भाविकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी आपापली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी केले.

१५ ऑक्टोबरपासून खासगी वाहनांना प्रवेशबंदी

नवरात्रोत्सवादरम्यान वाढणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून मनुदेवी मंदिराकडे जाणाऱ्या खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. खासगी वाहनांसाठी मनापुरीजवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार असून, तेथून पुढील सुमारे चार किलोमीटरचा प्रवास भाविकांना एसटी बसने करावा लागणार आहे.

यावल आगाराच्या १५ बसेस सेवेत

भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यावल एसटी आगाराच्या १५ बसेस मनुदेवी यात्रेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पार्किंगस्थळापासून मंदिरापर्यंत भाविकांची वाहतूक या बसेसच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक इम्रान खान पठाण यांनी दिली.

नवरात्रोत्सवात चोख पोलीस बंदोबस्त

नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता मनुदेवी परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे व त्यांचे सहकारी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत. महिला भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे