जळगाव

बांभोरी पुलावर भीषण अपघात : कार-कंटेनरच्या धडकेत 3 तरुण जागीच ठार..

धरणगाव तालुक्यातील झुरखेडे गावावर शोककळा..

जळगाव : शहराजवळील गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रविवारी रात्री कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत पंकज प्रकाश चौधरी, हरीश हिंमत चौधरी आणि रवींद्र अरुण चौधरी यांचा दुर्दैवी अंत झाला. तिघेही धरणगाव तालुक्यातील झुरखेडे गावचे रहिवासी होते. या घटनेमुळे झुरखेडे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंकज चौधरी, हरीश चौधरी आणि रवींद्र चौधरी हे तिघे कारने प्रवास करत होते. भुसावळजवळील वनोली येथे देवीची यात्रा सुरू असल्याने ते एका नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर ते जळगावच्या दिशेने आले आणि त्यानंतर आपल्या झुरखेडे या गावी परतत होते. मात्र, परतीच्या प्रवासात बांभोरी पुलावर त्यांच्यावर काळाने घाला घातला.बांभोरी पुलावर समोरून येणाऱ्या कंटेनरची कारला जोरदार धडक बसल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडकेनंतर कार जागेवरच फिरल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत कारमधील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर कंटेनरही पुलाच्या पुढील बाजूने खाली कोसळण्यापासून थोडक्यात बचावल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे दृश्य अत्यंत भीषण होते.  अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मदतीसाठी हालचाली सुरू झाल्या. मात्र, तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

अपघाताची बातमी झुरखेडे गावात पोहोचताच मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी केली होती. तरुणांच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. तिघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याने या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. देवीच्या यात्रेसाठी नातेवाईकाकडे गेलेला प्रवास परतीच्या वाटेवर मृत्यूच्या दुर्घटनेत संपल्याने झुरखेडे गावासह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव परिसरात बायपास दुरुस्तीची कामे सुरू असताना गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांमुळे जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. बांभोरी पुलावरील या भीषण दुर्घटनेनंतर वाहतूक व्यवस्थापन, वाहनांचा वेग आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित यंत्रणांनी या मार्गावरील वाहतुकीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे