नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत : अशोक जैन
माझं स्वप्न ‘नशामुक्त जळगाव’ अभियान उत्साहात

जळगाव,(प्रतिनिधी) : ‘व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जनजागृती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज असून, जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने वैशाली फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझं स्वप्न नशामुक्त जळगाव’ अभियानाला जैन उद्योग समूहाचे सहकार्य राहील’, असे आश्वासन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिले. या अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, प्रकल्प आणि जनजागृतीच्या विविध संकल्पनांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने वैशाली फाउंडेशनतर्फे आयोजित नशामुक्त जळगाव अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला वैशाली फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका वैशाली पाटील यांनी प्रास्ताविकेत या उपक्रमाबाबत माहिती सांगितली. राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन, पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, आ. मंगेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, महापौर दीपमाला काळे, आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी राहुल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सादरीकरणाद्वारे नशेचे दुष्परिणाम आणि त्याविषयीची जनजागृती याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला विविध शाळांमधील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.