सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशासमोर महागाई, बेरोजगारी,महिलांचे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले- ॲड. रोहिणी खडसे यांचा पुणे जिल्ह्यात प्रचाराचा झंझावात
जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पुणे जिल्हयातील शिक्रापुर येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आप, शेकाप संयुक्त महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ खान्देश – विदर्भातून शिरूर लोकसभा मतदारसंघात स्थायिक झालेल्या नागरिकांची कॉर्नर सभा आणि भेटीगाठी घेऊन डॉ. कोल्हे यांना निवडूनदेण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधतानारोहिणी खडसे म्हणाल्या, यंदाची लोकसभेची निवडणूक हि निर्णायक असुन देशाची पुढील दिशा ठरवणारी निवडणूक आहे. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणा विरोधात खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत वेळोवेळी आवाज उठविला जनसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडले, परंतु सत्ताधारी हे फक्त मोठ मोठ्या उद्योगपतींचे भले करणारे असुन सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. सामान्य जनतेला सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. सत्ताधाऱ्यांच्या परवानगीने आणि सहकार्याने महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग गुजरात व इतरत्र राज्यात पळवून नेले जात आहेत. त्यामुळे इथल्या स्थानिक युवकांचा रोजगार हिरावला गेला आहे. मोठे उद्योग बाहेरील राज्यात गेल्याने मोठ्या उद्योगांशी निगडित छोटे उद्योग करणारे व्यावसायिक देशोधडीला लागले आहेत.
पेट्रोल, डिझेलच्या भावात भरमसाठ वाढ झाली आहे. गॅस व इतर जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामुळे सामान्य जनता मेतकुटीला आली आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत त्यावर सत्ताधारी बोलायला तयार नाहीत उलट आक्षेपार्ह विधाने करून महिलांचा अपमान करत आहेत. त्यामुळे माता भगिनींच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.
शेतीमालाला भाव नाही, शेतमालावर निर्यातबंदी आहे शेतीसाठी लागणाऱ्या वस्तुच्या दरात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सत्ताधाऱ्यांच्या या चुकीच्या धोरणांमुळे आज देशासमोर महागाई, बेरोजगारी,महिलांचे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यामुळे सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा सेवेची संधी द्यावी, असे उपस्थितांना आवाहन केले.याप्रसंगी उमेदवार अमोल कोल्हे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते