पुणे

बालरंगभूमी परिषदेचे ‘बालरंगभूमी संमेलन’ पुणे येथे २० ते २२ डिसेंबर रोजी होणार..

बालरंगभूमी संमेलन बालकांसाठी विविध कलांची मेजवानी देणार - निलम शिर्के-सामंत

पुणे : बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित ‘बालरंगभूमी संमेलन’ पुणे येथील अण्णाभाऊ साठे स्मारक बिबवेवाडी येथे दिनांक २०,२१ व २२ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. असल्याची घोषणा बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अभिनेत्री ॲड निलम शिर्के-सामंत यांनी केली.

शिक्षण हा बालकाचा अधिकार आहे आणि कलाशिक्षण बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाची गरज आहे. बालकांच्या मनोरंजनासाठी व प्रबोधनासाठी बालरंगभूमी परिषद सातत्याने कार्यरत आहे. नृत्य, नाट्य ,गायन, वादन या रंगमंचीय कलांसोबत लहान मुलांना रमवणारे बाहुल्यांचे खेळ, जादूचे खेळ, शॅडो प्ले, जगलरी, इत्यादी खेळ बालरंगभूमीच्या कक्षेत येतात. मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या रंगमंचीय कलेचा, खेळांचा.. प्रचार आणि प्रसार करण्याचे उद्दिष्ट घेऊन वाटचाल करीत असलेल्या बालरंगभूमी परिषदेचे कार्य महाराष्ट्रभर २८ शाखांच्या माध्यमातून होत आहे. या शाखांचे कार्य व बालकलावंतांना राज्यस्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पहिल्या बालरंगभूमी संमेलनाचे आयोजन दि. २० ते २२ डिसेंबर दरम्यान पुणे येथे आयोजन करण्यात येणार असल्याचे बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के- सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी बोलतांना त्यांनी बालरंगभूमी संमेलनाचे उद्दिष्ट या संमेलनात सादर होणारे राज्यभरातील बालकलावंत व दिव्यांग बालकलावंतांच्या कार्यक्रमाची माहिती दिली. बालरंगभूमी संमेलनाध्यक्षपदी सिने-नाट्य अभिनेते मोहन जोशी यांचे नाव निश्चित झाले असून, संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते प्रशांत दामले, अभिनेते सयाजी शिंदे, अजित भुरे,अभिनेते व सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष विजय गोखले, सविता मालपेकर , सुबोध भावे यांच्यासह नाट्य व बालनाट्य क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तसेच संमेलन समारोप व पुरस्कार सोहळा दिनांक २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून या प्रसंगी बालरंगभूमी परिषद पुरस्कार जेष्ठ नाट्यकर्मी प्रतिभा मतकरी यांना देण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ मोहन आगाशे सचिन पिळगावकर, मोहन जोशी, गंगाराम गव्हाणकर, प्रियदर्शनी इंदुरकर , गणेश मतकरी, ऋजुता देशमुख व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सलील कुलकर्णी, संदीप खरे, पद्मश्री परशुराम गंगावणे, श्री उदय देशपांडे, मेघना एरंडे, शैलेश दातार यांचा देखील सन्मान करण्यात येणार आहे.

सिने बाल कलावंत मायरा वयकुल, निलेश गोपणार, स्वरा जोशी व इतर बाल कलावंताचे सादरीकरण या निमित्ताने होणार आहे. संमेलनानिमित्त बाल कलावंतांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे यात विविध कलांचे, चित्ररथांचे प्रदर्शन केले जाणार आहे.बालरंगभूमी संमेलनात महाराष्ट्राभर नावाजलेले बालनाट्य, बालकलावंतांचे सर्वोत्कृष्ट असलेले लोककलेचे कार्यक्रम तसेच महाराष्ट्रातील विविध दिव्यांग संस्थांच्या बालकलावंतांचे नामांकित कार्यक्रम, गायन, वादन, नृत्य, एकपात्री, नाट्यछटा , जादूगार, बोलक्या बाहुल्यांचे खेळ, पपेट शो, नाटुकल्या, ग्रिप्स थिएटर अदी भरगच्च कार्यक्रम संमेलनात सादर होणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने कलादालंनाची निर्मिती करण्यात आली असून यात चित्र ,शिल्प, रांगोळी , हस्तकला, मुखवटे आदींचे प्रदर्शन व प्रशिक्षण ठेवण्यात आलेले आहे. तसेच उपमंचावर देखील बाल कलावंतांच्या विविध एकल कलांचे सादरीकरण होणार आहे.

पत्रकार परिषदेस बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष राजू तुलालवार , उपाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, दीपा क्षीरसागर, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कोषाध्यक्ष नंदकुमार जुवेकर, सहकार्यवाह आसेफ अन्सारी, पुणे शाखेच्या अध्यक्ष दिपाली शेळके , मध्यवर्ती कार्यकारी सदस्य दिपक रेगे, योगेश शुक्ल, नागसेन पेंढारकर, अनंत जोशी, पुणे शाखेचे पदाधिकारी देवेंद्र भिडे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे