पुणे येथे शिवजयंती निमित्त आयोजित “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे,मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस..
यावल दि.१९ ( सुरेश पाटील )
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय मार्फत केंद्रीय मंत्री डॉ.मनसुखजी मांडविया,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच २०००० माय भारत स्वयंसेवकांसह “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा काढण्यात आली.
या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विकसित भारताला कायम प्रेरणा देणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज” यांचे नेतृत्व, शौर्य, धैर्य आणि चिरस्थायी वारशाचा गौरव केला गेला असून, युवावर्ग, स्थानिक नेते आणि नागरिकांना एकत्र आणत, प्रथमच महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारच्या पदयात्रा आयोजित केल्या गेल्या होत्या. निसर्गरम्य वातावरणातून ४ किलोमीटर अंतरांची वाटचाल करणाऱ्या या पदयात्रेचा आरंभ पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणातून होऊन,फर्ग्युसन महाविद्यालय येथे पदयात्रेची सांगता झाली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सदर पदयात्रेपूर्वी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली होती. यात ऐतिहासिक स्थळे आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता राबविणे, शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा प्रसार करण्यासाठी योगासनांच्या सत्रांचे आयोजन, शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आणि नेतृत्वावर आधारित पाहुण्यांची व्याख्यानमाला आयोजन, शिवाजी महाराजांच्या वारशाला अधोरेखित करणाऱ्या स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
संविधानाच्या ७५ वर्षपूर्तीच्या सन्मानार्थ आणि भारताची चैतन्यमय सांस्कृतिक विविधता साजरी करण्यासाठी नियोजित २४ पदयात्रांच्या मालिके मधील पुण्यातील “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा, ही सहावी पदयात्रा आहे. देशभरात अशाच प्रकारचे विविध कार्यक्रम केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय मार्फत वर्षभर आयोजित केले जाणार असून त्या माध्यमातून राष्ट्रभक्तीची भावना मनामनात रुजवणे आणि भारताच्या समृद्ध वारशाशी अनुबंध जोडणे हा त्यामागील उद्देश आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा तसेच अखंड आणि आत्मनिर्भर भारताबद्दलची त्यांची दूरदृष्टी, यांचा सन्मान करणेसाठी, भारतभरातील तरुणांनी माय भारत पोर्टलवर (www.mybharat.gov.in) नोंदणी करून या पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन मंत्रालयाने केले होते त्याला चांगल प्रतिसाद मिळाला.
यावेळी केंद्रीय मंत्री डॉ.मनसुखजी मांडविया, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिषजी शेलार,क्रीडा,युवक आणि अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रयजी भरणे,माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर,राज्यसभा खासदार श्रीमती मेधाजी कुलकर्णी, आमदार सिद्धार्थजी शिरोळे,आमदार हेमंतजी रासने इत्यादी प्रमुख उपस्थितीत होते.