कृषी केंद्रावर भेट देऊन रोहिणी खडसे यांनी साधला शेतकरी बांधवांशी संवाद..
बोदवड (प्रतिनिधी) : बोदवड तालुक्यात मृग नक्षत्राचा पाऊस बरसला आणि खरिप हंगामातील पेरणी लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून, बि-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधव कृषी केंद्रावर गर्दी करत आहेत.
दि.१३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या बोदवड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना, त्यांनी मनुर बु।। येथे एकनाथ खेलवाडे यांच्या गायत्री कृषी केंद्राला भेट दिली व तिथे उपस्थित असणाऱ्या शेतकरी व कृषी केंद्र संचालकांसोबत खते व बियाण्यांची उपलब्धता आणि इतर समस्यां विषयी चर्चा केली.
शेतकऱ्यांना योग्य त्या बियांण्याचा खतांचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा तसेच मागील वर्षी बोदवड तालुक्यात बोगस खतांची विक्री झाल्याने अनेक शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते यावर्षी बोगस बियाणे किंवा खतांचा पुरवठा होऊ नये तसेच बियाण्यांची जादा दराने विक्री होऊ नये यासाठी कृषी विभागाने सतर्क राहून योग्य ती पाऊले उचलावीत याबद्दल रोहिणी खडसे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केली.
तसेच शेतकरी बांधवानी सुद्धा बियाणे खते खरेदी करताना सजगता बाळगावी, खरेदी केलेल्या निविष्ठेचे सर्व तपशीलासह पक्के बिल घ्यावे, बियाणे खतांची वेष्टन पिशवी हंगाम होईपर्यंत जपुन ठेवावी खरेदी केलेल्या बियाण्याच्या पाकिटावरची उगवणीची अंतिम मुदत पाहून घ्यावी तसेच खरेदी केलेल्या बियाण्यांची याच हंगामासाठी शिफारस केलेली असल्याची खात्री करावी असे रोहिणी खडसे यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना आवाहन केले. यावेळी रामदास पाटिल, किशोर गायकवाड, गोपाळ माळी उपस्थित होते.