MIDC पोलीसांची मोठी कारवाई : चोरीच्या १५ मोटरसायकल हस्तगत..
जळगाव – जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पोलीसांना योग्य मार्गदर्शन केले होते. त्यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत आणि त्यांच्या पथकाने चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पावले उचलली.
पोलीस निरीक्षक संदिप पाटील आणि गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरात गुप्त बातमीदारांद्वारे एक महत्त्वाची माहिती मिळाली. माहिती अशी होती की एक व्यक्ती एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केलेल्या मोटार सायकलसह फिरत आहे. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर उपनिरीक्षक राहुल तायडे, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस कर्मचारी प्रदीप चौधरी, विकास सातदिवे, रतन गिते, राहुल घेटे, योगेश बारी, आणि योगेश घुगे यांची एक पथक तयार करण्यात आली.
सदर पथकाने कार्यवाही करत आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून विश्वासात घेत विचारपूस केली. आरोपीने आपले नाव विक्की नंदलाल भालेराव (वय-२८, वाघ नगर, जळगाव) असे सांगितले. त्याने सांगितले की, जळगाव शहरातील सागर पार्क येथून त्याने बहिणाबाई उत्सव दरम्यान एक मोटार सायकल चोरली होती.
त्यानंतर, आरोपीला अटक करून पोलीस कस्टडी मिळवून सखोल चौकशी केली असता त्याने पुढील माहिती दिली की, त्याने जळगाव शहरातील जिल्हा पेठ, रामानंद नगर, एम.आय.डी.सी., तसेच धुळे जिल्ह्यातील मोहाडी येथून एकूण १५ मोटार सायकल चोरल्या होत्या, ज्यांची किंमत ₹७,५०,०००/- आहे. याद्वारे, एकूण ९ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्या एम.आय.डी.सी. पो.स्टे ०२, जिल्हा पोलीस स्टेशन ०३, रामानंद नगर पोलीस स्टेशन ०३ आणि मोहाडी पोलीस स्टेशन, धुळे ०१ या स्थानांवर नोंदवले गेले आहेत. इतर चोरी केलेल्या मोटार सायकल्सची माहिती घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, ज्याचे काम पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोना/विकास सातदिवे, पोना/प्रदिप चौधरी, पोकों/रतन गिते हे करीत आहेत.