धरणगावात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींच्या निधीस मंजुरी..
धरणगाव (प्रतिनिधी ) : – सुरु असलेल्या पावसाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव येथिल बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी सर्व सुविधायुक्त उपजिल्हा रूग्णालयाच्या मुख्य इमारतीसाठी व निवासस्थान बांधकामासाठी 40 कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सतत पाठपुरावा केला होता. रुग्णांच्या हितासाठी उपजिल्हा रूग्णालयाला विशेष बाब म्हणून मंजुरी मिळाली आहे. यामुळे पालकमंत्र्यांनी धरणगाव वासीयांची मागणी पूर्ण केली असल्याने व चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे. सदर उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन लवकरच होणार आहे.
धरणगाव हे महत्वाचे आणि मोठे पेठेचे ऐतिहासिक शहर असून येथिल बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरातील जागेची निवड करण्यात आलेल्या ठिकाणी 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयास सुरु असलेल्या पावसाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत उपजिल्हा रुग्णालयाची मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी रुपये 39 कोटी 46 लक्ष 75 हजार इतक्या रकमेच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे धरणगाव व परिसरातील एकही रुग्ण आरोग्याच्या सोयी सुविधांपासून वंचित राहू नये रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याने तसेच चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आभार व्यक्त करतो.- पालकमंत्री गुलाबराव पाटील
अश्या असतील सुविधा
बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या लगतच्या परिसरात होणाऱ्या 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतरुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसुतीग्रुह, शस्त्रक्रिया ग्रुह, शवविच्छेदन विभाग, वाहन सुविधा (रुग्णवाहिका), नवजात अर्भक काळजी कोपरा, क्ष-किरण (TB), न्याय वैद्यकीय प्रकरणे, नेत्र तपासणी, कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रामंतर्गत आरोग्य सुविधा, मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया, एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडुन मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र, रक्त पुरवठा केंद्र द्वारे रुग्णांना उपचार केले जाणार आहेत.
असे असेल उप जिल्हा रुग्णालय
सदर अंदाजपत्रकामध्ये इमारतीचे बांधकाम G+२ असून निवासस्थान (टाईप-1) G+3, निवासस्थान (टाईप-2) G+3. निवासस्थान (टाईप ३) G+7, निवासस्थान (टाईप-4) G+4 आहे. एकूण इमारतीचे क्षेत्रफळ 8023.85 चौ.मी. इतके आहे. मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक, उपसंचालक आरोग्य सेवा, नाशिक व जिल्हा शल्य चिकित्सक, जळगाव यांनी प्रमाणित केले नुसार 50 खाटांचे उप जिल्हा रुग्णालय, येथील मुख्य रुपये 39 कोटी 46 लक्ष 75 हजार इतक्या रकमेच्या मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाला सुरुवात करण्यासाठी लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे.