नाईक महाविद्यालय रावेर येथे ताण – तणाव आणि कॉपीमुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा संपन्न..
(रावेर – हमीद तडवी )
रावेर – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि श्री विठ्ठलराव शंकरराव नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय रावेर, येथील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ताण-तणाव आणि कॉपीमुक्त परीक्षा अभियान ही कार्यशाळा दिनांक 12सप्टेंबर 2024 गुरुवार रोजी माननीय प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.
गुणवत्तापूर्ण व समाजभिमुख शिक्षणासाठी कॉपीमुक्त व ताण तणाव मुक्त परीक्षा महत्त्वाची आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले आणि विद्यार्थ्यांना प्रथमच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार घेतल्या जाणाऱ्या हिवाळी परीक्षा 2024 च्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. सी.पी. गाढे यांनी विद्यार्थ्यांना ताण-तणाव कारणे, परिणाम व उपाययोजना यावर मार्गदर्शन करून कॉपी म्हणजे काय, कॉफीचे विविध प्रकार,कॉपी झाल्यावर होणारी शिक्षा, विद्यापीठाचे ऑर्डिनन्स,परीक्षा पद्धती यावर सखोल मार्गदर्शन करून ताण तणाव मुक्त व कॉपीमुक्त परीक्षा अभियान खूप महत्त्वाचे आहे असे भाष्य केले.
संबंधित कार्यशाळेला उपप्राचार्य प्रा. एस. डी. धापसे तसेच आय क्यू ए सी चे समन्वयक डॉ. एस.जी.चिंचोरे , डॉ. जी.आर.ढेंबरे यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एस.बी.धनले यांनी विद्यार्थ्यांना ताणतणाव मुक्त परीक्षा अभियानावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. डी.वाय. महाजन तर आभार प्रा. एल. एम. वळवी यांनी केले.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ताणतणाव आणि कॉपीमुक्त अभियान राबविण्याची हमी दिली.