प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची रंगकर्मी व लोककलावंतांशी चर्चा..
रंगकर्मी व लोककलावंतांशी चर्चा : बालकलाकारांची लक्षणीय उपस्थिती
जळगाव(प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची सभा ३० जानेवारी रोजी सकाळी अजिंठा विश्रामगृहात मंडळाचे अध्यक्ष अभिनेते विजय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.राज्यात अथवा देशात मराठी भाषेतून रंगभूमीवर सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची संहिता वाचन करून त्याचे परीक्षण करून त्याला परवानगी देण्याचे काम हे मंडळ करते. रंगभूमी आणि सांस्कृतिक कामात योगदान दिलेल्या दिग्गजांची निवड या समितीवर केली जाते.
या बैठकीला शासनाचे प्रतिनिधी म्हणून या मंडळाचे अधीक्षक दिलीप वाघमारे यांच्यासह मंडळाचे सदस्य मकरंद पाध्ये (मुंबई), श्रीमती सुजाता मराठे (ठाणे), अशोक हंडोरे (कल्याण), संजय भाकरे (नागपूर), सागर लोधी (पुणे), विजय कुलकर्णी (पुणे), प्रकाश कुलकर्णी (पुणे), विश्वास पांगारकर (पुणे), जुगलकिशोर ओझा (कराड), मुकुंद पटवर्धन (सांगली), गुरुनाथ वठारे (सोलापूर), विवेक गरुड (नाशिक), पी.डी. कुलकर्णी (अहिल्यानगर), विनोद ढगे (जळगाव), विश्वनाथ निळे (जळगाव), जयंत शेवतेकर (औरंगाबाद), रमेश थोरात (अकोला), सुधाकर गीते (अकोला), रविंद्र नंदाने (वाशिम) आदी उपस्थित होते.
दुपारी कलावंत व लोककलावंत यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे बालकलावंतांनी समारंभाच्या ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथकासह पाहुण्यांचे स्वागत केले. खान्देशची लोककला वहीगायनाचे वाल्मिकी वही मंडळ जळगावतर्फे यावेळी सादरीकरण करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले व अधीक्षक विजय वाघमारे यांचे बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल व प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी सन्मानचिन्ह देवून स्वागत केले.
यावेळी रंगमंचावर ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे व चिंतामण पाटील उपस्थित होते. रंगकर्मींनी रंगभूमी सेन्सॉर बोर्डच्या सभेत सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र देणे, अथवा काही परीनिरीक्षणात उणिवा, रंगभूमी कालची, आजची आणि उद्याची अधिक सकस कशी होईल याबाबत विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष श्री.गोखले व मंडळाच्या सदस्यांनी उत्तरे दिलीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निमंत्रक व रंगभूमी मंडळाचे सदस्य विनोद ढगे यांनी केले. शहरातील रंगकर्मी, लोककलावंत, बालकलाकार व पत्रकारांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन महाजन, मोहित पाटील, देवराज बोरसे, कृष्णा चव्हाण, आकाश भावसार, आकाश बाविस्कर, अवधूत दलाल यांनी विशेष परिश्रम घेतले.