ग्रामपंचायतीचा ठराव न घेता माती वाहतुकीस परवानगी….
माहिती मिळताच सर्कल अधिकारी घटनास्थळी दाखल..
पाडळसे : येथील सरपंच पाटील मॅडम यांनी कोणताही ठराव न घेता परस्पर सावदा येथील एका व्यक्तीस गावातील सर्वे नं. 1234 मधील गौशाळा परिसरातील माती खोदून वाहतूक करण्यास परवानगी दिल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच सर्कल अधिकारी बबिता चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ग्रामपंचायतीला माती वाहतुकीस परवानगी देण्याचा कोणताही अधिकार नाही. हे अधिकार महसूल विभागाच्या अधीन असून त्यासाठी संबंधित परवानग्या घेणे आवश्यक असते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. पुनम पाटील, सदस्य छोटू बाविस्कर, उपसरपंच सौ. अलका कोळी तसेच सामाजिक कार्यकर्ते भरत चौधरी, योगेश चौधरी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांमध्ये सरपंचाच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात असून ग्रामसभेचा अपमान झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.