अमळनेर पोलीसांची कारवाई : चोरी झालेले वाहन जप्त..

अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरातील ओमसाई श्रद्धा नगर येथून एका मारुती डिझायर कारची चोरी झाल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना, अमळनेर पोलिसांनी मध्य प्रदेशातून नागपूरसह जळगावात चोरीस गेलेल्या दोन वाहने जप्त केली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनने हि कारवाई केली आहे.
प्रवीण हरिश्चंद्र ठाकूर यांच्या घरासमोरून त्यांची दीड लाख रूपये किंमतीची पर्पल पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी डिझायर कार (क्र. एमएच १८ एजे ३११०) दि. २४ मे २०२५ रोजी रात्री चोरीला गेली होती. त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, यांच्या सूचनेनुसार, अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. शरद बागल यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेषण पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
पोलिसांचे पथक दि. ६ जुलै रोजी मध्य प्रदेशात गेले. दि. ७ जुलै रोजी त्यांना मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्ह्यातील सितामउ तालुक्यातील रावठी गावात संशयित आरोपी राहुल पाटीदार याच्या घरामागील गोडाऊनमध्ये चोरीचे वाहन लपवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.सितामउ पोलिसांच्या मदतीने राहुल पाटीदारच्या घराची व गोडाऊनची झडती घेतली असता, तिथे अमळनेरमधून चोरी झालेल्या डिझायर कारसोबतच इतर दोन चोरीची वाहने आढळून आली.
यात ३५ लाख रूपये किंमतीची पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्यूनर (क्र. सीजी १० बीएल ६७७६) आणि १२ लाख रूपये किंमतीची पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार (क्र. एमपी ०४झेडएल २९६३) यांचा समावेश होता. या दोन्ही वाहनांचे चेसिस आणि इंजिन नंबर नष्ट करण्यात आले होते. फॉर्च्यूनर नागपूर येथील राणाप्रताप नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आहे तर क्रेटा जळगाव (तालुका) पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त केलेली सर्व वाहने अमळनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आली आहेत.