4 हजाराची लाच : महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाचा उपविभागीय अधिकारी (वर्ग -1) एसीबी च्या ताब्यात..

अमळनेर : येथील महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी यांना 4 हजाराची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार खाजगी ठेकेदार असून त्यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मौजे व मजरे हिंगोणे, ता. चोपडा येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे ३,५५,०००/-रुपयांचे काम पूर्ण केले होते. या कामाचा अहवाल बनवून देण्याच्या मोबदल्यात उपविभागीय अधिकारी दिलीप पाटील यांनी १३ ऑक्टोबर रोजी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या २ टक्के, म्हणजे ७,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १५ ऑक्टोबर रोजी ला.प्र.वि. जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी दिलीप पाटील यांनी बिलाच्या २ टक्के, (७००० रूपये) लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४,०००/- रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविली.
त्यानुसार, १५ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली. या कारवाई दरम्यान लोकसेवक दिलीप पाटील यांनी तक्रारदाराकडून ४,०००/- रुपये लाच रक्कम त्यांच्या अहवालाचे काम करून देण्याच्या मोबदल्यात स्वतःसाठी ‘बक्षीस’ म्हणून स्वीकारली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. दिलीप दत्तात्रय पाटील हे ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, अमळनेर (विभाग महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण, वर्ग-०१) येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई
एसीबी चे पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, सफौ. विलास पाटील, पोहेकों. नरेंद्र पाटील, पोना. हेमंतकुमार महाले ( नंदुरबार) आणि पोकों. राकेश दुसाने यांनी केली.