एरंडोल मध्ये शेतात शॉक लागून 5 जणांचा जागीच मृत्यू..

एरंडोल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरखेडी गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. शेतात वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या तारेच्या कुंपणाला रोहित्रातून वीजप्रवाह सोडल्याने ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. मात्र, दीड वर्षाची एक मुलगी या भीषण घटनेतून बचावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना बुधवार, २० ऑगस्ट रोजी सकाळी घडली.
मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले विकास रामलाल पावरा (वय ३५) हे कुटुंबासह रोजगारासाठी एरंडोल तालुक्यात आले होते. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा परिवार खेडी खडका परिसरातून एरंडोल शहराच्या दिशेने जात असताना, एका शेतकऱ्याच्या शेतातून जात होता. याच शेतात पिकांच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण लावून त्यात वीजप्रवाह सोडण्यात आला होता. एकाच कुटुंबातील पाच जणांना तारेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत विकास रामलाल पावरा (वय ३५), त्यांची पत्नी सुमन विकास पावरा (वय ३०), मुले पवन विकास पावरा आणि कंवल विकास पावरा, तसेच एक वृद्ध महिला यांचा समावेश आहे. कुटुंबातील दीड वर्षाची मुलगी दुर्गा विकास पावरा मात्र सुदैवाने बचावली. घटनेची माहिती मिळताच, एरंडोल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.