स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण..

जळगाव : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी-जवान तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
“समाजातील प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी देण्यासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध आहे. शेतकरी, महिला, युवक, कामगार आणि सर्वसामान्यांच्या सक्रिय सहभागातून जळगाव जिल्ह्याची विकासाची वाटचाल वेगाने सुरू आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले.कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, उपवनसंरक्षक सौरीश सहाय, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.पालकमंत्री पाटील यांनी स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचे स्मरण करत संविधानाने दिलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची मूल्ये जपण्याचे आवाहन केले. “आपल्या कर्तृत्वातून जिल्ह्याच्या आणि देशाच्या विकासाला हातभार लावणे हीच आजच्या पिढीची खरी राष्ट्रसेवा आहे,” असे त्यांनी सांगितले.
महाराजस्व’ शिबिरांतून दोन लाखांहून अधिक लाभार्थी
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत मार्च ते मे २०२६ या कालावधीत महसूल मंडळ स्तरावर ९६ शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांतून १ लाख ९ हजार ८२४ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच २२ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय आयोजित ११ शिबिरांतून १ लाख ९ हजार ६९३ लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
महिला-बालकांच्या सुरक्षा व आरोग्याला प्राधान्य
महिला व बालकांच्या संरक्षणासाठी विविध योजना राबविण्यात येत असून, एप्रिल २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत १२४ अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यापैकी सात बालकांना या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत संधी मिळाली आहे.‘सखी वन स्टॉप सेंटर’च्या माध्यमातून संकटग्रस्त महिलांना वैद्यकीय, कायदेशीर, मानसिक व सामाजिक समुपदेशनासह आवश्यक सहाय्य आणि तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला जात आहे. चालू वर्षात ३१६ महिलांनी या सेवांचा लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.आरोग्य क्षेत्रात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ ही मोहीम १ एप्रिल २०२६ पासून लोकसहभागातून राबविण्यात येत आहे. क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत जिल्ह्यात ५ लाख १३ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, ९४५ गावे क्षयरोगमुक्त घोषित करण्यात आली आहेत.
‘व्यसनमुक्त जळगाव, विकसित जळगाव’चा संकल्प
युवकांना आवाहन करताना पालकमंत्री म्हणाले की, “युवकांनी आपली ऊर्जा व्यसनात नव्हे, तर शिक्षण, क्रीडा, कौशल्य, नवउद्योजकता आणि देशसेवेसाठी वापरावी.” ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ या संकल्पनेतून ‘व्यसनमुक्त जळगाव, विकसित जळगाव’ घडविण्यासाठी युवक, पालक, शिक्षक, सामाजिक व धार्मिक संस्था तसेच नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.१५ ते २१ ऑगस्टदरम्यान आयोजित जलसंधारण सप्ताह तसेच २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘महा वॉकेथॉन—वॉक फॉर वॉटर’मध्ये जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.‘महास्ट्राईड’मध्ये जळगावची राज्यात अव्वल कामगिरी
राज्य शासनाच्या ‘महास्ट्राईड’ प्रकल्पांतर्गत कामगिरीच्या मूल्यमापनात जळगाव जिल्ह्याने १०० टक्के एकत्रित गुणांकन मिळवत राज्यातील सर्वोच्च स्तरावरील कामगिरी नोंदवली आहे. या कामगिरीमुळे जिल्हा १६ कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीसाठी पात्र ठरला आहे.या यशाबद्दल पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
जवानास ताम्रपट पदकाने सन्मान
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. ‘महास्ट्राईड’ प्रकल्पातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सन्मान करण्यात आला.देशांतर्गत सुरक्षा मोहिमेदरम्यान शत्रूशी झालेल्या गोळीबारात अपंगत्व आलेले पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील सीआरपीएफ कॉन्स्टेबल तथा युनिट चालक जावीद अहमद शेख यांना राज्य शासनाकडून प्राप्त ताम्रपट पदकाने सन्मानित करण्यात आले.याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्यासह २६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक, अति उत्कृष्ट सेवा पदक, विशेष सेवा पदक तसेच पोलीस पदकाने गौरविण्यात आले. विविध स्पर्धा व उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनाही पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मृद व जलसंधारण तसेच जलसंवर्धनाबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच जलसंधारण सप्ताहानिमित्त आयोजित ‘महा वॉकेथॉन—वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या लोगोचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.समारोपप्रसंगी पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि जिल्हावासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याचा अभिमान आणि संविधानाच्या मूल्यांचा सन्मान राखत प्रत्येकाने आपल्या क्षेत्रातून जिल्ह्याच्या आणि देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे. सर्व घटकांच्या सहभागातून विकसित जळगाव आणि विकसित भारताचा संकल्प साकार करूया, असे आवाहन त्यांनी केले.
