‘डायल 112’ कॉलकडे दुर्लक्ष : पोलिस कर्मचाऱ्याची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली..

जळगाव : नागरिकांच्या आपत्कालीन मदतीसाठी कार्यरत असलेल्या ‘डायल 112’ सेवेमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर कारवाई केली आहे. मदतीसाठी आलेल्या कॉलवर प्रत्यक्ष घटनास्थळी न जाता कॉल बंद केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याची तात्काळ नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल सतीश सुकलाल निकम हे डायल 112 वाहनावर ड्युटीवर होते. त्यांच्या एमडीटी मशीनवर तीन आपत्कालीन कॉल्स आले होते. मात्र, त्या कॉल्सवर आवश्यक ती कार्यवाही न करता त्यांनी घटनास्थळी न जाताच कॉल बंद केल्याचे समोर आले.आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी डायल 112 सेवा कार्यरत आहे. अशा परिस्थितीत संबंधित कर्मचाऱ्याने निष्काळजीपणा केल्याने सेवेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जळगाव तालुका पोलीस ठाण्यातून तातडीने कार्यमुक्त करून नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश दिले.
या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.