१२ लाखांच्या बिलासाठी ५० हजारांची लाच : ग्रामसेवक ACB च्या जाळ्यात..

अमळनेर : १५ व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर झालेल्या १२ लाख रुपयांच्या विकासकामांच्या बिलासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने अमळनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या चुलत भावाला अमळनेर तालुक्यातील नगाव बु. येथे गटार बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविणे अशी एकूण १२ लाख रुपयांची दोन कामे मिळाली होती. या कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी संबंधित ग्रामसेवकाने एकूण बिलाच्या ७ टक्के प्रमाणे ८४ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.दि. २४ एप्रिल २०२६ रोजी आरोपीने तक्रारदाराकडे ८४ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने दि. ३० एप्रिल २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी करताना पंचांसमक्ष रविंद्र देविदास पवार, ग्रामसेवक याने ८४ हजार रुपयांच्या मागणीपैकी १३ हजार रुपये यापूर्वी फोन-पे द्वारे स्वीकारल्याचे मान्य केले. त्यानंतर तडजोडीअंती ५० हजार रुपये लाच स्वीकारण्याचे ठरले.
पथकाने अमळनेर शहरातील केलेनगर येथील रविंद्र देविदास पवार, ग्रामसेवकाच्या राहत्या घरी सापळा रचला. यावेळी रविंद्र देविदास पवार, ग्रामसेवक याला ५० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला. या प्रकरणी त्याच्या विरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदर कारवाई
पोलीस उप अधिक्षक, योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, स्मिता नवघरे, पोउपनिरी/सुरेश पाटील पोहेकॉ/बाळु मराठे, पोहेकॉ/किशोर महाजन, पोहेकॉ/सुनिल वानखेडे, पोकॉ/भूषण पाटील, पोकॉ/मनोज पाटील, पोकॉ/प्रणेश ठाकुर, पोकॉ/अमोल सुर्यवंशी, पोकॉ/सचिन चाटे यांनी केली