निंभोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई : घरफोडीच्या तीन गुन्ह्यांची उकल..

रावेर (प्रतिनिधी) हमीद तडवी – निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या तीन गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
निंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील खिर्डी येथे राहणाऱ्या शेहनाज शेख अख्तर या आपल्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी १३ ते १४ सप्टेंबर २०२६ दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ६ लाख ३२ हजार ८१० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांना आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान एका आरोपीला मुंबई येथून, तर इतर आरोपींना खिर्डी येथून ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्यामध्ये नवाज शेख शरीफ (वय २३), अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख रमजान (वय ३२), शहादत बेग रफिक बेग (वय २२), चेतन लिलाधर जाधव (वय २९) आणि शाकीब बेग साबीर बेग (वय ३२), सर्व रा. खिर्डी खुर्द, ता. रावेर यांचा समावेश आहे.तपासादरम्यान नवाज शेख याच्याकडे चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शहादत बेग याला मुंबई येथून, तर अशपाक ऊर्फ अट्ट्या शेख आणि शाकीब बेग यांना खिर्डी येथून ताब्यात घेतले.
अटकेतील आरोपींकडून पहिल्या घरफोडीतील चोरीस गेलेल्या मालापैकी ५ लाख ७९ हजार ३१० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. यामध्ये सोन्याची पोत, कानातील झुमके, अंगठ्या तसेच चांदीचे फुलतोडे, गुजऱ्या, बांगड्या व हातातील कड्यांचा समावेश आहे.
आरोपींची अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी खिर्डी गावातच आणखी दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या तपासातून चेतन जाधव याचेही नाव निष्पन्न झाले. या दोन्ही गुन्ह्यांमधील चोरीस गेलेल्या एकूण १ लाख ७७ हजार ४०० रुपयांच्या मुद्देमालापैकी ३७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. यामध्ये सोन्याच्या बाळ्या तसेच चांदीच्या लक्ष्मी, शारदा, बालगोपाळ आणि गणेशाच्या मूर्तींचा समावेश आहे.
अशाप्रकारे निंभोरा पोलिसांनी तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करून एकूण ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेतील आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ए. एम. ढाकणे, ममता आर. तडवी तसेच पोहेकॉ रिजवान पिंजारी, पोहेकॉ अविनाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुआष शिंदे, परेश सोनवणे, किरण जाधव, सर्फराज तडवी व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
