चाहूल उन्हाळ्याची : पाऱ्याची ३३ अंशाकडे वाटचाल
गतवर्षी पेक्षा १५ % जलसाठ्यात घट, १५ गावांना १६ टँकर द्वारे पाणीपुरवठा
जळगाव – जिल्ह्यात सूर्याचे मकर वृत्ताकडे वाटचाल सुरू झाल्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. ११/१२ वाजेपासून उन्हाचे चटके जाणवत असून पारा ३३ अंशाच्या जवळपास सरकला आहे. तर दुसरीकडे दरवर्षी सरासरी पर्जन्यमान असलेल्या चाळीसगाव तालुक्यात कमी पावसामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसात टँकर ने पाणीपुरवठा करावा लागला असून सद्य स्थितीत १६ टँकरद्वारे १५ गावांची तहान भागवली जात आहे.
ऐन पावसाळ्यात होता टँकरने पाणीपुरवठा
जिल्ह्यात यावर्षी अगोदरच मान्सून मध्ये पावसाने पाठ फिरवली होती, त्यामुळे काही अंशी पिकांच्या वाढीसह उत्पादनावर देखील परिणाम झाला आहे.दरवर्षी चाळीसगाव तालुक्यात पावसाची सरासरी बऱ्यापैकी असते. परंतु यावेळी मात्र ऐन पावसाळ्यात देखील टँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे.
जिल्ह्यात रावेर तालुका वगळता यावर्षी अन्य काही तालुक्यात पावसाने जेमतेम सरासरी देखील गाठलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात १४ तालुक्यातील काही मंडळात दुष्काळी परिस्थिती जाणवत आहे.
जिल्ह्यात सरासरी ५७.८७ % उपयुक्त जलसाठा
जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पासह मध्यम आणि लघु प्रकल्पात आजमितीस सरासरी ५७.८७% उपयुक्त जलसाठा आहे. यात हतनूर २२२ दलघमी (८७.०६%) गिरणा २१५ दलघमी (४१.२५%) वाघूर. २११.२० दलघमी (८४.९८%) असून मोठ्या प्रकल्पात ६४९.१५ दलघमी नुसार सरासरी ६३.२०टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
यासोबतच १३ मध्यम प्रकल्पात अभोरा ३६.२९, मोर ९०.३४, सुकी ९०.८९, तोंडापुर ८०.८९, मंगरूळ ८६.९०, गुळ ८२.५१, बहुळा ५८.७९, हिवरा ४३.८२, अग्नावती ३४.९२, अंजनी ४६.८२, बोरी ३६.२९, भोकरबारी २५.९२ आणि मन्याड ०.०० % असा १०९.५७ दलघमी अर्थात ५३.७४% उपयुक्त जलसाठा सद्यस्थितीत उपलब्ध आहे. तर ९६ लघु प्रकल्पात ६७.३७ दलघमी नुसार ३४.२८% उपयुक्त जलसाठा लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पात सद्यस्थितीत उपलब्ध आहे.
गतवर्षी होता ७१.५३ % उपयुक्त जलसाठा
गतवर्षी सरासरी पेक्षा पर्जन्यमान अधिक असल्याने सर्वच प्रकल्पात निम्मे पेक्षा अधिक ७१.५३ टक्के उपयुक्त जलसाठा होता.
१६ टँकर सह २ गावांसाठी विहीर अधिग्रहण
यावर्षी अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने चाळीसगाव तालुक्यात १५ गावांना पाण्याचे दुर्भिक्ष आहे. यात विसापूर तांडा अंधारी कडगाव कृष्णा नगर हिरापूर तामगव्हाण रोहिणी राजदेहरे घोडेगाव हादगाव वस्ती पिंपरी खराडी दोन दिगर या टंचाईग्रस्त गावांची १६ टँकर तहान भागवत आहेत. तसेच २ गावांसाठी विहीर अधिग्रहण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.