१० हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक ACB च्या जाळ्यात..
एरंडोल – तालुक्यातील नेपाणे येथील श्री. संत हरिहर माध्यमिक हायस्कूल च्या मुख्याध्यापकास १० हजारांची लाच घेताना जळगाव एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले असुन संदीप प्रभाकर महाजन असे कारवाई झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार हे लोकसेवक यांचे शाळेत शिपाई पदावर नेमणुकीस आहेत. त्यांच्या मागील प्रलंबित वेतन निश्चितीच्या फरकाची रक्कम २,५३,६७०/-रुपये मंजूर करण्याचा प्रस्ताव वेतन अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग जळगांव यांच्या कडे पाठविला होता. सदर प्रस्ताव मंजुरीचे काम मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन यांनी स्वतः च्या ओळखीने करून दिले होते. त्याचा मोबदला म्हणुन मंजुर रकमेच्या ५ % प्रमाणे १२,५००/-रुपये लाचेची मागणी मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन यांनी केली होती.त्याबाबत तक्रारदार यांनी दि.२५ जुन रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारी प्रमाणे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन यांनी वेतन निश्चितीचे आलेले २,५३,६७०/-रुपयांचे ५% प्रमाणे १२,५००/-रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडीअंती १००००/-रुपयांची मागणी केली. त्यानंतर दि. २७ जुन रोजी मुख्याध्यापक संदीप प्रभाकर महाजन यांना मुख्याध्यापक कार्यालय निपाने ता.एरंडोल येथे १००००/-रुपये लाच घेतांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले असून त्याच्या विरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक, सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पीएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, यांनी ही कारवाई केली
ईतर महत्वाच्या बातम्या