राज्यभरातील अडीच हजारांवर पत्रकारांच्या पाल्यांपर्यंत पोचविल्या शैक्षणिक किट..
'व्हॉईस ऑफ मीडिया'च्या शैक्षणिक कक्षाचा पुढाकार प्रवेश, समुपदेशन, वसतिगृह,परदेशी शिक्षणसाठी झाले अभूतपूर्व काम.
मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यभरातील सुमारे अडीच हजार पत्रकारांच्या पाल्यांपर्यंत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने दर्जेदार शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून भवितव्यासाठी हातभार लावला आहे. या उपक्रमाचे राज्यभरातील पत्रकार वर्तुळात स्वागत आणि कौतुक झाले आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पंचसूत्री मध्ये पत्रकारांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी कार्य करण्याचे ठरवले आहे. याच जाणिवेतून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पत्रकार बांधवांच्या सुमारे अडीच हजारांवर पाल्यांना शैक्षणिक किटच्या रूपाने साहित्याचे वितरण करण्यात आले. या शिवाय पत्रकारांच्या पाल्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने अनेक स्वरूपाचा पुढाकार घेतला आहे.
अनेक कॉलेज आणि शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे. समुपदेशनच्या माध्यमातून संकटात सापडलेल्यांना योग्य वाट दाखवण्यासाठी मोठे काम झाले आहे. वसतिगृहात प्रवेश मिळवून देणे. परदेशी शिक्षणासाठी मदत करणे, आदी विषय पत्रकारांच्या मुलांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पुढाकार घेऊन मार्गी लावले आहेत. राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन पत्रकारांच्या पाल्यांना समुपदेशन, शैक्षणिक मार्गदर्शन व साहित्याचे वितरण करण्यात आले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पंचसूत्रीमधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे पत्रकारांच्या पाल्यांचे शिक्षण आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ने आर्थिकदृष्ट्या अक्षम असलेल्या पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचे ठरवले. त्यासाठी अगोदर सर्व्हे करण्यात आला होता. अनेकांकडून फॉर्म मागवण्यात आले होते.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या टीमने या किटमध्ये चांगल्या प्रतीच्या वस्तू असाव्यात व सर्व वस्तू गरजेच्या असाव्यात असे ठरले. या किटमध्ये सॅक(स्कूल बॅग), टिफीन, पाणी बॉटल, सहा वह्या, कंपास बॉक्स, परीक्षा पॅड, कलर पेन्सिल बॉक्स, चित्रकला वही हे साहित्य होते. या उपक्रमाला घेऊन संदीप काळे म्हणाले की, पत्रकारांच्या पाल्यांना केली जाणारी शैक्षणिक मदत ही त्यांच्या आगामी काळातील भवितव्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे. संघटना आपल्या परीने अधिकाधिक मदत करण्याचा प्रयत्न यापुढेही करत राहील, कारण पत्रकारांचे पाल्य हाच त्यांच्या वृद्धापकाळचा आधार असतील. या वेळी प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले की, पत्रकारांच्या पाल्यांसाठी यावर्षी केलेली मदत ही प्रातिनिधिक स्वरूपात व छोट्या प्रमाणात होती. दरवर्षी यामध्ये वाढ करण्याची संघटनेची भूमिका आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या शैक्षणिक सेलचे प्रमुख तथा सरचिटणीस चेतन कात्रे यांनी शालेय किट (साहित्य) प्रकरणी पुढाकार घेतला. चेतन कात्रे म्हणाले, पत्रकारांच्या पाल्यांचे भविष्य उज्ज्वल बनले पाहिजे, या भूमिकेतून संघटना हे पाऊल उचलत आहे. आगामी काळात उच्च शिक्षणासाठी देखील आवश्यक मदत, मार्गदर्शन व प्रयत्न करण्याचा संघटनेचा मानस आहे.
संघटनेचे उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांचेकडे साहित्य खरेदीची, ती वितरित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मुख्य संयोजक तथा कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी पुढाकार घेतला होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोठा कार्यक्रम घेण्यात आला. ज्यामध्ये पत्रकारांच्या यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. शालेय किट (साहित्य) वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे संघटनेच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी संबंधित पत्रकारांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांच्या पाल्यांना हे किट सुपूर्द केले. यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. समुपदेशक म्हणून डॉ. प्रमोद दस्तुरकर, प्रदेश प्रवेशासाठी, वसतिगृह प्रवेशासाठी गजाजन मोरे, हे काम पाहत आहेत.