प्रकाशाला सख्ख्या पित्याचे काळे कारनामे; अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार तर आईने दिली फिर्याद..
(नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : नंदुरबारच्या घटनेला चार दिवस होत नाही तो प्रकाशा ता. शहादा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली. येथे तर सख्ख्या पित्याने माणूसकीला काळे फाशित आपल्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने मुलीला दिवस गेलेत. पोट दुखण्याच्या कारणाने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता सख्ख्या पित्याचे काळे कारनामे उघडकीस आले. त्यामुळे हतबल आईने आपल्या पती विरोधात पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली.पोलिसांनी तत्काळ संशयितास ताब्यात घेतले. या घटनेने प्रकाशासह परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रकाशा येथे राहणाऱ्या गणेश नामक (वय 40) व्यक्तीने एप्रिल 2024 ते जुलै 2024 च्या दरम्यान स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी राहत्या घरी ती एकटी असतांना लैंगिक अत्याचार केला. त्यातून तिला दिवस गेलेत. तसेच सदर घटना कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी तिला दिली होती. त्यामुळे त्या मुलीने वडिलांच्या अत्याचार सहन केला. मात्र, पोट दुखत असल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता सदरची बाब उघडकीस आली. त्याबाबत विचारले असता मुलीने वडिलांनीच अत्याचार केल्याचे सांगितले. त्यामुळे मुलीची आई हादरली आणि आपल्या मुलीसह शहादा पोलिस स्टेशन गाठत सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे यांना नवऱ्याचे कारनामे सांगितले. मोरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ फिर्याद नोंदवित संशयिता विरोधात पास्को कायद्या अंतर्गत तसेच भादवि 376, 376(2)(एफ),(एन),506 व लैगिंक अपराध पासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4(2), 5(एन) (एल) 8,12 प्रमाणे गुन्हा नोंदविला. पोलिसांनी गणेश यास ताब्यात घेतले आहे. शहाद्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन मोरे, प्रतापसिंग मोहिते, पोलिस उपनिरीक्षक मधुरी आर. कंखरे आदींनी लागलीच घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मधुरी कंखरे करीत आहेत.