जळगाव शहरासह जिल्ह्यात गावठी दारूचा सुळसुळाट कोणाच्या आशीर्वादाने..

जळगाव : जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हातभट्टी व गावठी दारूचा उत आला असून, संबंधित विभागाकडून त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही.
जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बऱ्याच वेळेस कार्यालयात उपस्थित नसतात. अधिकारी कधी येतात, कधी जातात, याची कोणालाच माहिती नसते. कार्यालयीन उपस्थितीबाबत देखील कोणतीही पारदर्शकता नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.
जळगाव शहराजवळील देऊळगाव भोलाणे तसेच ग्रामीण भागातील अनेक गावं यावल तालुक्यातील जंगल परिसर, येथे देशी दारूच्या अवैध भट्ट्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या ठिकाणी तयार होणारी दारू दररोज चोरट्या मार्गाने जळगाव शहरात पोहचवली जात आहे. तसेच शहरात देखील मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारू विक्री होते त्यामुळे शासनाच्या महसुलाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मात्र दुर्लक्ष होत. आहे. ही गंभीर बाब आहे. कारवाई केली जाते तीही केवळ थातूरमातूर स्वरूपात. त्यामुळे हातभट्टी व्यवसाय पुन्हा सुरू होतो आणि तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, सामाजिकदृष्ट्या हा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. यामागे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय सर्वसामान्य जनतेमध्ये व्यक्त केला जात आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ‘आशीर्वादाने’च हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळे या अवैध भट्टयांवर कठोर कारवाई व्हावी व गावपातळीवर दारूबंदी पूर्णपणे अमलात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.