शहाद्यात अतिक्रमण हटाव मोहिम, तीन रस्त्यांसह 80 फुटी रस्ता मोकळा श्वास घेणार का याकडे लक्ष….
(नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : शहादा येथील नगरपालिका प्रशासनातर्फे या आठवड्यात शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे. त्यादृष्टीने अतिक्रमण धारकांना गत पाच दिवसांपासून नोटिसा दिल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील चार मुख्य रस्ते आणखीन काही दिवसांसाठी मोकळा श्वास घेतील अशी चर्चा आहे. यासोबत अतिक्रमण हटाव मोहिमेला होणारा खर्च लक्षात घेता पुन्हा अतिक्रमण होणार नाही याकडेही पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शहादा शहराचा दिवसागणिक विस्तार वाढत आहे. नवीन वसाहतींसोबत लोकसंख्ये सोबत दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्याही वाढली आहे. मात्र शहराचा मध्यवर्ती भाग होता तेवढाच आहे. शहरातील पालिका चौक, मुख्य बाजारपेठ, डोंगरगाव व जुना मोहिदा रस्ता, महात्मा जोतिबा फुले चौक, डायमंड कॉर्नर रस्ता, तूप बाजार, खेतिया रस्ता, गांधी पुतळा या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणामुळे शहराला विद्रुपीकरणाचे स्वरुप आले असून वाहतुकीची समस्याही वारंवार उद्भवते. नगरपालिकेतर्फे याआधीही अनेकवेळा अतिक्रमण हटविण्यात आले आहे.
परंतु काही दिवसानंतर पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ होते, हा शहरवासीयांचा अनुभव आहे. शहादा शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्याही वाढली आहे. परिणामी शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहने व नागरिकांची वर्दळही वाढली आहे. सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान व सायंकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नगरपालिका चौक, महात्मा गांधी पुतळा, जुना खेतिया रोड, स्टेट बँकेसमोरील रस्ता आणि जुना मोहिदा रस्ता याठिकाणी वाहनांची व पादचारी लोकांची प्रचंड वर्दळ असते. मात्र या भागात फळ, भाजीपाला व इतर वस्तू विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतूक वारंवार विस्कळीत होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पालिकेतर्फे १०० पेक्षा जास्त अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच या आठवड्यात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी दिली. शहाद्यात चार प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणाचा मुद्दा दरवेळी चर्चेला येतो. यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मिशन बंगला पर्यंतचा 80 फुटी रस्त्यावरील स्टेट बँक परिसर आणि पाण्याची टाकी ते मिशन बंगला हा रस्ता नेहमीचा अतिक्रमित ठरला आहे. तसेच पालिके पासूनच ते सोनार गल्ली पर्यंतचा मेन रोड, पालिका हद्दीतील डोंगरगाव रोड आणि जुना मोहीदा रस्ता हे रस्ते दुतर्फा वाहतुकीचा असताना या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अतिक्रमित ठेले, टपऱ्या आणि दुकानदारांमुळे पायी चालणाऱ्या सुद्धा रस्ता शोधावा लागतो. चार वर्षांपूर्वी मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या कार्यकाळात अतिक्रमण हटविण्यात आले होते. रस्त्यांनी आणि नागरिकांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र, त्यानंतर पालिका प्रशासनाने पुन्हा अतिक्रमण होणार नाही याकडे दुर्लक्ष केले. आता तरी ती चूक होणार नाही याचेही भान ठेवण्याची गरज आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या