एरंडोल मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील यांचा दणदणीत विजय..
एरंडोल – विधानसभा निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबर शनिवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.दुपारी निकाल लागला. शिंदे गटाचे अमोल पाटील यांना १ लाख १ हजार १८८ मते मिळाली.तर त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ.सतीश पाटील यांना ४४ हजार ७५६ मते मिळाली.तर अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांना ४१ हजार ३९५ मतांचा कौल दिला.विजयी उमेदवार अमोल पाटील यांनी ५६ हजार मतांची आघाडी घेतली.
मतमोजणीसाठी एकूण २३ फेऱ्या झाल्या असून विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासून अमोल पाटील यांनी आघाडी घेतली.त्यानंतर शेवटपर्यंत त्यांच्या आघाडीत वाढ झाली.त्यामुळे त्यांना भरघोस मते मिळाली.मतमोजणी केंद्राबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची अलोट गर्दी दिसून आली.सतत अमोल पाटील यांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे लक्षात आल्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली.अमोल पाटील यांचा विजय निश्चित आहे हे कळल्यावर कार्यकर्त्यांनी बाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला. निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील हे कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रावर दाखल झाले.निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा आमदार निवडीचे प्रमाण पत्र देण्यात आले.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर करीत जल्लोष केला.अनेकांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून अभिनंदनाचा वर्षाव केला.
केंद्राबाहेर जे सी बी द्वारे आमदार अमोल पाटील यांच्यावर फुलांचा व गुलालाचा वर्षाव करण्यात आला.तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार अमोल पाटील यांना पुष्पहार देऊन त्यांचे अभिनंदन केले.त्यानंतर वाचत गाजत आमदार अमोल पाटील यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीची सांगता मरिमाता मंदिर परिसरात करण्यात आली..