चाळीसगाव – शेत जमीनीच्या नावाच्या वादात तब्बल 5 लाख रूपयांची मागणी करून यातील 2 लाख रूपये स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी गावाचा सरपंच, ग्रामपंचायतीचा शिपाई तसेच एका खाजगी ईसमा विरोधात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
या संदर्भातील माहिती अशी की, तक्रारदार यांची मौजे बहाळ रथाचे ता.चाळीसगाव येथे 1 हेक्टर 64 आर अशी शेत जमीन असून सदर शेतजमिनीवर ग्रामपंचायत बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी ग्रामपंचायती विरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता.
यानंतर गावाचे सरपंच राजेंद्र महादू मोरे यांनी तक्रारदाराला भेटून त्यांच्या शेतजमिनी बाबत ग्रामपंचायत कडून कोर्टकचेऱ्यांचा त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असे सांगितले. याला तक्रारदार यांनी नकार दिल्याने त्यांनी तब्बल 10 लाख रू. लाचेची मागणी केली. यावर संबंधीत व्यक्तीने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती.या अनुषंगाने तक्रारदार यांच्या तक्रारीची दि. 29/11/2024 रोजी पंचां समक्ष पडताळणी केली असता सरपंच राजेंद्र महादू मोरे तसेच याच ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत असणारा शांताराम तुकाराम बोरसे यांनी तक्रारदार यांच्याकडे दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून देण्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केली असता, त्यास तक्रारदार यांनी नकार दिल्याने या दोघांनी 10,00,000/- रू लाचेची मागणी करून तडजोडी अंती 5,00,000/- रुपयांना स्वीकारल्याचे मान्य केले होते.
दरम्यान 26 रोजी तक्रारदार यांचे बहाळ येथील राहत्या घरी सापळा लावला असता सरपंच राजेंद्र महादू मोरे तसेच याच ग्रामपंचायतीत लिपीक म्हणून कार्यरत असणारा शांताराम तुकाराम बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता 2,00,000/-रुपये पंचांसमक्ष स्वीकारताना खाजगी ईसम सुरेश सोनू ठेंगे यांना रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
सदरची कारवाई धुळे एसीबी चे पोलीस उपअधिक्षक सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे तसेच हवालदार राजन कदम, पावरा, सुधीर मोरे, शिपाई रामदास बारेला, प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी- राजेंद्र महादू मोरे, ( वय – 57 रा. बहाळ , ता. चाळीसगाव पद -सरपंच ग्रामपंचायत बहाळ रथाचे, ता चाळीसगाव ) तसेच ग्रामपंचायतीतील लिपीक शांताराम तुकाराम बोरसे, (वय 50 वर्ष,रा. बहाळ रथाचे ता.चाळीसगाव ) आणि खासगी इसम सुरेश सोनू ठेंगे, ( वय 40 वर्ष, व्यवसाय – शेती, रा.बहाळ ता.चाळीसगाव ) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.