वसंतात बहरला पळसाचा फुलोरा..
पळस हे मराठी नाव हिंदीत पलाश तर इंग्रजीत पळसाला फ्लेम ऑफ द. फॉरेस्ट असे म्हणतात.मराठी साहित्यात वेगवेगळ्या कवींनी निसर्गाच्या सानिध्यातील झाडा,वेलींचे, फुला,फळांचे,पक्षांचे सूक्ष्मज्ञान अवगत करून तीन मुख्य ऋतू बरोबर सहा उप ऋतूतील वातावरणातील बदल कवितेत टिपले आहेत. पळस हा वसंत ऋतूत केसरी, रंगाने बहरून गेलेला वृक्ष आहे.कवयित्री शांता शेळके त्यांच्या कवितेत म्हणतात.
पळस
गगना गंध आला
मधुमाश धुंद झाला
फुलले पलाश राणी
जळत्या ज्वाला
आले वनावनात
सहकार मोहरून
भ्रमरास मंजिरीची
चाहूल हे दुरून
भरला मकरंद कोषी
वेलीस अंकुराची
वलये किती सुरेख
लिहितात अंगुलिंनी
वाऱ्यात प्रेम लेख
संदेश प्रेमिकांना
दुरुनी आला
हिवाळा ऋतू असल्यानंतर फाल्गुन महिन्याच्या आगमनात शिशिर ऋतूत जंगलातील इतर वृक्षांची पानझड सुरू होते. झाडावरील पिवळी पालवी गळून पडताना हवेत जणू पताकांची उधळणच होताना दिसते. अशा निसर्गरम्य वातावरणात पळस मात्र वसंत ऋतूत केसरी रंगाने बहरून गेलेला दिसतो. दिवसागणिक सायंकाळचे दृश्य वेगळच भासतं “सायंकाळी लाल बुंद थाळी
पाना पानांवर किरण सोनेरी”
सोनेरी किरणं पडलेली दिसतात सूर्याची तेजस्वी किरण जणू आशीर्वादच झांडाना पोहोचवतात त्यामुळे हे वातावरण आल्हाददायक वाटते. पळस झाड तेच बहर तोच पण अग्नी फुलांचा दिमाख मात्र नवा अशा निसर्गरम्य जंगलात पळस वृक्ष अग्नि दिव्याच्या ज्योतीने पेटून उठल्यासारखा भासतो. ह्या वातावरणाला आकर्षित होऊन वेगवेगळ्या रंगाचे पक्षी झाडाच्या खालीवर जमतात भारद्वाज (काकड कुंबाऱ्या),कोकीळ (कुहू), बुलबुल, सुतार पक्षी, चष्मेवाला, खार या पशु पक्षांची जणू मेजवानीच भरते. अशाच प्रसंगी रानवेलींनी ग्रासलेल्या पळस वृक्षावर अंकुरलेल्या फुलांवर मधमाशी पराग कण गोळा करण्यासाठी धिंगाणा घालते. पळस हे झाड डोंगरमाथ्यावर, दरीखोरीत, तर कुठे पडीक माळरानावर फुलांनी फांद्या लवून आलेल्या मोठ्या प्रमाणात आढळतात. पळसाचे पान तळहाताच्या आकारासारखी जाड असतात. त्याचा उपयोग आदिवासी भागात जेवणासाठी पत्रावळी,सनापावनाला देवाला नैवेद्य (बोनं) दाखवण्यासाठी घरावरील छप्पर शिवण्यासाठी, जळलेल्या लाकडाच्या निखार्यावर (इंगळांवर) भाजी बनवण्यासाठी करतात त्याला पातोळी म्हणतात. जंगलातील रानमेवा,फळ जमा करण्यासाठी डोना बनवतात. सगळीकडे पळसाला पाने तीनच अशी म्हण प्रचलित आहे. पळस फुलांचा उपयोग रंग बनवण्यासाठी करतात पळसाची साल आयुर्वेदिक असल्याने औषध बनवण्यासाठी वापरतात. पळस हे झाड वनस्पती सृष्टी मध्ये बहुगुणी वृक्ष म्हणून मानले जाते. अशी माहिती आदिवासी संशोधक अभ्यासक प्रा. सुभाष कामडी यांनी दिली आहे.