अमळनेर येथे होणाऱ्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते संपन्न..
जळगांव – ३० व ३१ मार्च २०२५ रोजी अमळनेर येथे अहिराणी साहित्य परिषदेतर्फे होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज रोजी माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी, अमळनेर येथील अहिराणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. डी . डी . पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, समन्वयक रणजित शिंदे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे, डी . ए. पाटील , सुनील पाटील तसेच प्रा. डॉ. सत्यजित साळवे आदी मान्यवरांप्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात ते पाचवे अहिरानी साहित्य संमेलन होणार असून या निमित्ताने आर्टिस्ट किरण बागुल यांनी तयार केलेल्या या संमेलन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बोलीभाषा ही संस्कृती संवर्धनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने जास्तीत जास्त रसिकांनी या संमेलनात सहभाग घ्यावा असे आवाहन याप्रसंगी करीत अहिराणी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या तर प्रा.डॉ. लिलाधर पाटील यांनी हा लोगो खानदेश व अहिराणी संस्कृतीचे प्रतीक असल्याचे सांगून या लोगोत खानदेशाचे आद्य मातृदैवत कानबाई ही शीर्षस्थानी आहे तर अहिराणीचे प्रतीक असलेले बाराखडीतील आद्याक्षर “अ” येथील कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या हिरव्या रंगाने रंगविलेले आहे. खानदेशी संस्कृती ही शेतावर काम करणाऱ्या शेतकरी कामगार कष्टकरी व अलुतेदार बलुतेदारांनी आपल्या कष्टाने निर्माण केलेली संस्कृती असून स्वातंत्र्योत्तर भारतात भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या हक्क अधिकारांमुळे येथील नवशिक्षित पिढीच्या हाती लेखणी आली व आपल्या लेखणीच्या साह्याने त्यांनी विविध कला प्रकारात साहित्य निर्मितीला सुरुवात केली या साऱ्यांचा परिपाक म्हणून अहिराणी असे देखील दर्जेदार साहित्य निर्मिती होत असून त्याचाच जागर करण्यासाठी अमळनेर येथील साहित्य संमेलन आहे असा संदेश देणारे हे बोधचिन्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अहिराणी साहित्य व सांस्कृतिक परंपरा दाखवणारी शोभायात्रा, कथा, कविता, गीते, नाटिका, मिमिक्री, परिसंवाद आधी विविध साहित्य प्रकारातून व्यक्त होणाऱ्या साहित्यिकांचे व कलाकारांचे कलाविष्कार तसेच मान्यवर विचारवंतांचे मार्गदर्शन यामुळे खानदेशवासीयांना अमळनेर मध्ये साहित्यिक व सांस्कृतिक मेजवानी मिळणार असल्याचे याप्रसंगी प्रा.अशोक पवार यांनी सांगितले. पाचवे अहिराणी साहित्य संमेलन यशस्वी व्हावे म्हणून अमळनेर मधील विविध संस्था संघटना व कार्यकर्ते उत्स्फूर्तपने मेहनत घेत असल्याचे संमेलन समन्वयक रणजित शिंदे यांनी सांगितले.