10 हजारांची लाच : मेहुणबारे येथील दोघ शिक्षक ACB च्या जाळ्यात..

चाळीसगाव – मेहुणबारे येथील शिक्षकांना 10 हजारांची लाच घेतांना धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.
तकारदार हे मेहुणबारे येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या मेहुणबारे माध्यमिक विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाला आहे. त्यास याच संस्थेच्या मेहुणबारे उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी सायन्स या वर्गात प्रवेश घ्यावयाचा होता.याबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार व त्यांच्या मुलाने २७ मे रोजी या शाळेत जावून तेथे उपशिक्षक गुलाब साळुंखे व लिपिक पंजाबराव देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी तक्रारदारांना त्यांच्या मुलाच्या प्रवेशा करीता २० हजार रुपये द्यावे लागतील. त्यातील १० हजार रुपये ऑनलाईल अर्ज केल्यावर व उर्वरित १० हजार रुपये शाळेत प्रवेश घेतांना द्यावे लागतील. त्याशिवाय शाळेत प्रवेश होणार नाही,सांगितले.त्यानंतर तक्रारदारांनी धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे २८ रोजी याबाबत तक्रार दिली. या तक्रारीची २९ मे रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता उपशिक्षक गुलाब साळुंखे यांनी तक्रारदारांकडे अकरावी सायन्सचा प्रवेशाचे काम करुन देण्याकरीता २० हजार रुपये लाचेची मागणी केले. तर उपशिक्षक उल्हास बागुल यांनी तक्रारदार यांना उपशिक्षक गुलाब साळुंखे यांच्याकडे लाच देण्याकरीता प्रोत्साहित केले. त्यानंतर ३० रोजी उपशिक्षक गुलाब साळुंखे यांना तक्रारदाराकडून १० हजार रुपये लाचेची रक्कम शाळेचा आवारात स्वीकारतांना रंगेहात पकडले.
त्यांच्याविरुध्द मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पो.नि. रुपाली खांडवी तसेच राजन कदम, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.