एरंडोल :- रिंगणगाव येथील चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.अल्पवयीन बालकाची हत्या नरबळीचा प्रकार असण्याचा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांनी केला असून पोलिसांनी तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, यांनी भेट देवून पाहणी केली.जळगाव येथून श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आले.दरम्यान संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हत्येतील आरोपींना त्वरित अटक करून त्यांचेविरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कडक उन्हात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरला होता.
याबाबत माहिती अशी,की रिंगणगाव येथील गजानन नामदेव महाजन यांचे रिंगणगाव येथे हार्डवेअरचे दुकान असून ते जळगाव येथे गेले होते.त्यांनी त्यांचा मुलगा राजेश गजानन महाजन (वय-१४) यास दुपारी चार वाजेला दुकान उघडण्याचे सांगितले होते.राजेश याने दुकान उघडले व सात वाजेपर्यंत दुकानात थांबला होता.सात वाजेनंतर दुकान बंद केल्यानंतर राजेश हा घरी आला नाही.रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गजानन महाजन हे घरी आले असता मुलगा अद्याप घरी आला नसल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. गजानन महाजन यांचेसह त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याचा परिसरात शोध घेतला असता तो सापडला नाही.राजेश हरवल्याची तक्रार एरंडोल पोलीसस्थानकात दाखल करण्यात आली होती.गजानन महाजन यांच्या शेताजवळ असलेल्या मोकळ्या जागेतील काटेरी झुडूपात राजेशचा मृतदेह सापडल्याने गावात एकाच खळबळ उडाली. राजेशचा मृतदेह सापडल्याचे समजताच त्याच्या परिवारातील सदस्यांनी आक्रोश केला.राजेशच्या गळ्यावर तिष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे समजताच पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचेसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान राजेशचा मृतदेह सापडल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.राजेशची हत्या नरबळीचा प्रकार असल्याचा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांनी केला. राजेशच्या हत्येमुळे गावात तणावपूर्ण शांतता होती पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.
दरम्यान राजेशच्या हत्येच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी दुपारी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करून आरोपींना त्वरित अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली.जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,उपअधीक्षक विनायक कोते ,तहसीलदार प्रदीप पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा करून आरोपींना त्वरित अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले
याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीसस्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. गावातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.राजेशच्या पच्छात आई,वडील,बहिण असा परिवार आहे.