इलेक्ट्रॉनिक्स गोदामातील ३५ लाखांची चोरी करणाऱ्यांना बाजारपेठ पोलीसांनी केली अटक..
१८ लाखांचा मुद्देमाल जप्त..
भुसावळ – शहरातील सिंधी कॉलनी येथे नुकत्याच घडलेल्या एका मोठ्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ बाजारपेठ आणि जळगाव एलसीबी पथकाच्या पोलिसांना यश आले आहे. सुमारे ३५ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी झाल्याची ही घटना १५ आणि १६ जून २०२५ दरम्यान व्यापारी नंदलाल मिलकीराम मकडीया यांच्या गोदामात घडली होती. पोलिसांनी चोरलेल्या मुद्देमालापैकी १८ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी शिरपूर येथून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. १५ जूनच्या सायंकाळपासून १६ जूनच्या सकाळपर्यंत अज्ञात चोरट्यांनी मकडीया यांच्या राजस्थान मार्बल जवळील पत्राच्या गोदामाचे शटर उचकटून आत प्रवेश केला होता. या गोदामातून चोरट्यांनी फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी आणि एलईडी टीव्ही यांसारख्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी केली होती. ३५ लाखांच्या वस्तू चोरल्याप्रकरणी १७ जून रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन भुसावळ बाजारपेठ पोलीस, जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या पथकांनी एकत्रितपणे तपासाची चक्रे फिरवली. भुसावळ, चोपडा, धरणगाव, जळगाव शहरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवली. तपासादरम्यान, चोरीचा मुद्देमाल शिरपूर शहरातील करवंद रोडवरील महावीर लॉन्स येथील एका खाजगी गोदामात लपवून ठेवल्याची माहिती समोर आली.माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने छापा टाकून पंचांसमक्ष १८ लाख ८० हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी, ज्या गोदामात चोरीचा माल ठेवण्यात आला होता, त्याचे मालक मुजावर जामील शेख चांद (वय ४८, रा. न्यू बोराडी, शिरपूर) आणि जफर शेख मुजावर (वय २४, रा. मुजावर मोहल्ला, शिरपूर) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक संदीप पाटील, भुसावळ बाजारपेठ पोलीस निरिक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग कार्यालय येथील हवालदार उमाकांत पाटील, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे विजय नेरकर, संदीप धनगर, सचिन चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर अढाळे, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, राहुल वानखेडे, जावेद शहा, स्था गु शाखा पथक पोउपनिरी शेखर डोमाळे, सहा फौज रवी नरवाडे, हे कॉ गोपाळ गव्हाळे, हे कॉ मुरलीधर धरगर, पो हे कॉ संदीप चव्हाण, पो हे कॉ प्रविण भालेराव, चालक भरत पाटील, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पो हे कॉ महेश चौधरी, पो शि राहुल भोई अश्यांनी केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक राहुल टि. वाघ करीत आहेत.