मुक्ताईनगर

शस्त्रासह दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक : मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई..

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर पोलीस ठाणे हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांनी कारवाई करत दोन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, लोखंडी रॉड आणि बनावट क्रमांक प्लेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला आळा घातला.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलावर एका स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ अपघात झाला होता. त्यावेळी परिसरात नियमित गस्त घालत असलेल्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या सेकंड मोबाईल पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच वाहन चालकासह दोन जण घटनास्थळावरून पसार झाले. मात्र वाहनातील अन्य दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान संशयितांनी त्यांच्या हालचालींबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने पोलिसांनी वाहनाची कसून झडती घेतली. यावेळी वाहनातून एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, एक दोरी, लोखंडी रॉड, दोन मोबाईल फोन तसेच एक बनावट क्रमांक प्लेट जप्त करण्यात आली.

तपासात फरार झालेला वाहन चालक प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध बीड, अहमदनगर, बुलढाणा, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये सुमारे १८ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यास बीड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू असून अटक करण्यात आलेल्या 1) चंद्रकांत विष्णू वाघ 2) कैलास कारभारी घोडके या दोघांकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे