ब्रेकिंग

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण..

शाबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

जळगाव (प्रतिनिधी )– ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेती, कृषी उद्योजकता आणि नेतृत्व कौशल्य विकसित करणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) या संस्थेच्या १२ व्या वार्षिक अधिवेशनात संस्थेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून शाबोर्नी पोद्दार यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. यंदाचे अधिवेशन तीन टप्प्यात जैन हिल्स येथे १ ते ८ जून २०२६ दरम्यान होणार आहे.

जैन इरिगेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या अधिवेशनात सुमारे १,५०० विद्यार्थी, ९० कृषी शिक्षक, १८ माजी विद्यार्थी आणि फालीला पाठबळ देणाऱ्या १० कंपन्यांतील ७० हून अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. सहभागी विद्यार्थी हे फाली-१२ अंतर्गत २१० शाळांमध्ये आयोजित व्यवसाय मॉडेल व कृषी तंत्रज्ञान नवकल्पना स्पर्धांचे विजेते आहेत.

फाली हा इयत्ता ८ वी आणि ९ वीतील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राबविला जाणारा अनोखा कार्यक्रम असून, आधुनिक आणि शाश्वत शेतीसाठी आवश्यक तांत्रिक, व्यावसायिक व नेतृत्व कौशल्ये विकसित करण्यावर त्याचा भर आहे. वर्गातील संवादात्मक सत्रे, आधुनिक कृषी प्रकल्पांना भेटी, उद्योगतज्ज्ञांशी संवाद आणि कृषी व्यवसायाची प्रत्यक्ष ओळख या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

कृषी उद्योजकतेला चालना देण्यासाठी फालीचा विस्तार..

फाली-१२ उपक्रमाला जैन इरिगेशन, गोदरेज ॲग्रोव्हेट, यूपीएल, आयटीसी, स्टारअ‍ॅग्री, प्रॉम्प्ट डेअरीटेक, एसबीआय फाउंडेशन, टाटा रॅलिस आणि ओम्निवोर या अग्रगण्य कृषी व वित्तीय संस्थांचे सक्रिय सहकार्य लाभले आहे. संस्थेच्या आगामी योजनांमध्ये दरवर्षी २५ टक्के वाढ साधत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि आणखी तीन राज्यांमध्ये विस्तार करणे, माजी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप, बीजभांडवल व मार्गदर्शन कार्यक्रम वाढविणे तसेच शहरी युवकांसाठी ‘FALI e+’ उपक्रमाचा विस्तार करून कृषी उद्योजकतेला चालना देणे यांचा समावेश आहे.

फालीच्या सीईओपदी शाबोर्नी पोद्दार

संस्थेच्या स्थापनेपासून २०१४ पासून सीईओ पदाची जबाबदारी सांभाळणारे हर्ष नौटियाल १ जूनपासून कृषी उद्योजकतेच्या नव्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी पदमुक्त होणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली फालीने महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रभावी आणि परिवर्तनकारी उपक्रम उभा केला. तसेच देशातील अग्रगण्य कृषी कंपन्यांशी आर्थिक व तांत्रिक भागीदारी निर्माण करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नवीन सीईओ शाबोर्नी पोद्दार यांना कृषी, ग्रामीण विकास आणि सामाजिक क्षेत्रातील दहा वर्षांहून अधिक अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी भारतातील अग्रगण्य ॲग्रीटेक इम्पॅक्ट फंड ओम्निवोर येथे विपणन व तांत्रिक सेवांचे नेतृत्व केले आहे. तसेच मायक्रोसेव्ह कन्सल्टिंगमध्ये अन्न, शिक्षण, ग्रामीण वित्त आणि विकास क्षेत्रातील विविध प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद (IRMA) येथून एमबीए तसेच पत्रकारितेतील पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

 

*फाली भारतीय शेतीचे भविष्य असल्याचे मान्यवरांचे मत…*

फाली असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जैन यांनी फालीच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करताना शाबोर्नी पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली संस्था आणि माजी विद्यार्थी कार्यक्रम अधिक व्यापक होतील, असा विश्वास व्यक्त केला. हवामान-स्मार्ट शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि मूल्यसाखळीची कार्यक्षमता वाढविणे हे भारतीय शेतीचे भविष्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तर नादिर गोदरेज यांनी फालीच्या माजी विद्यार्थी कार्यक्रमाच्या विस्तारासाठी मोठी संधी असल्याचे सांगितले. राज्जू श्रॉफ यांनी फालीमुळे तरुणांमध्ये तांत्रिक, व्यावसायिक आणि नेतृत्व कौशल्यांचा विकास होत असून ते भारतीय शेतीतील उत्पादकता वाढ व हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम होतील, असे मत व्यक्त केले. फालीच्या उपाध्यक्षा आणि एनबीए एंटरप्राइज सोल्युशन्स टू पॉव्हर्टीच्या अध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी शाबोर्नी पोद्दार यांच्या नेतृत्वामुळे फालीची कृषी व कृषी उद्योजकतेची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे