जळगाव पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ : मुक्ताईनगर तालुक्यातील 5 गावामध्ये मोठी कारवाई..

जळगाव – पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल उचलत मुक्ताईनगर तालुक्यातील कथित ‘ड्रॉप केस’साठी कुप्रसिद्ध ठरलेल्या पाच गावांवर विशेष मोहीम राबवली. पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करून राबविण्यात आलेल्या या कारवाईला ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ असे नाव देण्यात आले असून, पोलिसांच्या मते हे अभियान अत्यंत यशस्वी ठरले आहे.

मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील लालगोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित दुर्मिळ वस्तूंचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी समोर येत होत्या.
सोशल मीडियावर आमिष, प्रत्यक्षात फसवणूक
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सुलेमानी पत्थर, जुने सोने, कॉपर, शंख, डबल इंजिन अशा कथित मौल्यवान वस्तूंचे व्हिडिओ व्हायरल करून देशभरातील नागरिकांना गावांमध्ये बोलावले जात होते.
यानंतर संबंधितांना बनावट वस्तू दाखवून मोठ्या व्यवहाराचे आमिष देत आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये विरोध करणाऱ्यांना धमकावणे, मारहाण करणे तसेच वन्यजीव संबंधित गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून तक्रार करण्यापासून परावृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मागील तीन वर्षांतील गुन्हेगारीची नोंद
या परिसरात मागील तीन वर्षांत खालील गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले — दरोडा – १०- खुनासह दरोडा – १- खून – १- जबरी चोरी – ७- फसवणूक – १६- दरोड्याचा प्रयत्न – १- सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला – २ मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून खालील मुद्देमाल जप्त केल्याचा दावा केला आहे —- रोख रक्कम : ₹२० लाख – सोन्याचे दागिने : सुमारे ३०० ग्रॅम (अंदाजे ₹३० लाख) – चांदीचे दागिने : सुमारे ४ किलो (अंदाजे ₹८ लाख) – २ गावठी कट्टे व ३ जिवंत काडतुसे – हरण, कोल्हा व सशाचे कातडे – ४ चारचाकी व ६ दुचाकी वाहने – ३० मोबाईल फोन
विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई
या मोहिमेदरम्यान शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, भारतीय न्याय संहिता तसेच वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत विविध गुन्हे नोंदवून संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच पूर्वीच्या प्रकरणांतील काही फरार आरोपींनाही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. २०० पोलिसांचा सहभाग पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. या कारवाईत विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि सुमारे २०० पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
गुन्हेगारीविरोधात निर्णायक कारवाई
अल्प लोकसंख्या असलेल्या गावांमधून सातत्याने गंभीर गुन्हे समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही मोहीम राबवली. पुढील काळातही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा सुरू राहतील, असा संकेत पोलिस प्रशासनाने दिला आहे.