जामनेरमध्ये बनावट कापूस बियाणे विक्रीचा पर्दाफाश : 9.15 लाखांचा साठा जप्त..

जामनेर : तालुक्यात शेतकऱ्यांची दिशाभूल करून बनावट व अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री केल्या जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत समोर आला आहे. या कारवाईत तब्बल ₹9 लाख 15 हजार 416 किमतीचा बियाणे साठा जप्त करण्यात आला असून अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील साईनगर परिसरात एका घरातून मोठ्या प्रमाणात कापूस बियाण्यांची साठवण व विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून तपासणी केली. कारवाईदरम्यान घरामध्ये विविध ब्रँडच्या नावाने पॅक करण्यात आलेल्या कापूस बियाण्यांच्या गोण्या आणि पॅकेट्स आढळून आली. पोलिसांनी 40 गोण्या आणि एकूण 1016 पॅकेट्स जप्त केली. प्राथमिक तपासात संबंधितांकडे बियाणे साठवण व विक्रीसाठी आवश्यक परवाने किंवा वैध कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. जप्त साठ्यामध्ये Diya-59 (KDCHH 02 BG II) आणि Krish-45 (KDCHH 065 BG II) या नावाने विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या बियाण्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. अधिकृत परवानगीशिवाय बाजारात बियाणे आणल्याचा संशय व्यक्त केला जात असून कृषी विभागाने यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
या प्रकरणात कृषी विकास अधिकारी, पंचायत समिती जामनेर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात प्रोबेशनरी उपविभागीय पोलिस अधिकारी (DySP) प्रशांत दरेकर यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.
सदर प्रकरणात दीपक राजमल चौधरी (जामनेर), गुलाब आधार पाटील व शेषराव पाटील (ता. पाचोरा) यांच्यासह इतर संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) 2023, बियाणे अधिनियम 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.