लालमाती आश्रमशाळेची लक्ष वेधणारी नेत्रदीपक कामगिरी : एकाच वेळी झाले तीन पुरस्कारांनी गौरव..

यावल ( प्रातिनिधी ): जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावल यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विविध उपक्रम व आदर्श कर्मचारी स्पर्धेतील गुणवंतांचा गौरव सोहळा ५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, लालमाती, ता. रावेर, जि. जळगाव हिने आपल्या उल्लेखनीय कामगिरीची मोहोर उमटवत एकाच वेळी तीन मानाचे पुरस्कार पटकावले.‘सुंदर माझी शाळा’ उपक्रमात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेला ₹७५,००० रोख पारितोषिक, गौरव प्रमाणपत्र व आकर्षक स्मृतीचिन् प्रदान करण्यात आली. यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार साहेब यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक मनेश तडवी यांनी स्वीकारला.
याचबरोबर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक के. पी. ठाकरे यांना माध्यमिक शिक्षक गटातील ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’,व आरोग्यअधी परिचारिका श्रीमती ललिता भारंबे यांना ‘आदर्श अधिपरिचारिका पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
शाळेने शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची ही पावती मानली जात आहे. एका शाळेला एकाच कार्यक्रमात तीन पुरस्कार मिळणे ही लालमाती आश्रमशाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब ठरली आहे.
या गौरव सोहळ्यास यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार , सहायक प्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे , प्रशात माहुरे साहेब तसेच प्रकल्प कार्यालय, यावल येथील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
लालमाती आश्रमशाळेच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या तिहेरी यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे