यावल

कागदपत्रांच्या फेऱ्या बंद करा’ : दुष्काळ पंचनाम्यांवर आमदार अमोल जावळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा..

बामनोद, फैजपूर येथे अचानक भेट देत घेतला पंचनाम्यांच्या कामाचा आढावा..

यावल (प्रतिनिधी) : दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याऐवजी कागदपत्रांच्या नावाखाली कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर आमदार अमोल जावळे यांनी थेट महसूल कार्यालयांची पाहणी केली. बामनोद आणि फैजपूर येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांना अचानक भेट देत त्यांनी दुष्काळ पंचनाम्यांच्या प्रक्रियेचा आढावा घेतला.

पंचनाम्यांसाठी आवश्यक माहिती उपलब्ध असताना शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, अशा स्पष्ट सूचना आमदार जावळे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. आधारकार्ड, डीबीटीसाठी बँक खाते तपशील आणि ॲग्रीस्टॅकशी संबंधित आवश्यक माहितीच्या आधारे प्रक्रिया पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.

विशेषतः आवश्यकता नसताना ७/१२ उतारा, ८-अ किंवा इतर कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांना अडवणूक करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे पात्र शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहता कामा नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.“शेतकरी आधीच दुष्काळामुळे अडचणीत आहे. त्याला कागदपत्रांसाठी कार्यालयांच्या फेऱ्या मारायला लावणे योग्य नाही. आवश्यक माहिती घ्या आणि पंचनामे वेळेत पूर्ण करा,” अशा शब्दांत आमदार जावळे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी त्यांनी पंचनाम्यांची सद्यस्थिती, कार्यालयीन कामकाज आणि शेतकऱ्यांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारींची माहिती घेतली. रावेर-यावल मतदारसंघातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी आणि महसूल यंत्रणेने पंचनाम्याची प्रक्रिया शेतकरीकेंद्री आणि सुलभ पद्धतीने राबवावी, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अनावश्यक कागदपत्रांच्या मागणीबाबत तक्रारी आल्यानंतर प्रशासनाने संबंधित आदेश तत्काळ मागे घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे दुष्काळ पंचनाम्यांच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.शासनाची मदत पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी पंचनामे पारदर्शक, सुलभ आणि विनाविलंब पूर्ण करण्यावर भर देण्याचे आवाहन आमदार जावळे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे