अक्कलकुवा येथे निहारिका कोळी मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा : यावल तालुका आदिवासी टोकरे कोळी समाजाचे तहसीलदारांना निवेदन..
मूक मोर्चातून न्यायाची मागणी

यावल (प्रतिनिधी) : अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहात निहारिका कोळी हिचा झालेला संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व पारदर्शक चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी यावल तालुका आदिवासी टोकरे कोळी समाजाच्या वतीने करण्यात आली.
या मागणीसाठी समाजबांधवांच्या वतीने यावल येथे मूक मोर्चा काढण्यात आला. शेतकी संघापासून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डीकर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.मोर्चापूर्वी शेतकी संघात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या उपस्थितीत समाजबांधवांची बैठक झाली. बैठकीत निहारिका कोळीच्या मृत्यू प्रकरणाबाबत चर्चा करून घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक असल्याचे उपस्थितांनी सांगितले. मृत्यूमागील नेमकी परिस्थिती तपासून संबंधित कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनाद्वारे घटनेशी संबंधित सर्व बाबींची चौकशी करून उपलब्ध पुरावे, परिस्थिती आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांच्या आधारे सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच चौकशीत कोणाचीही भूमिका निष्पन्न झाल्यास त्याच्यावर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी प्रभाकर आप्पा सोनवणे, नितीन सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. निहारिका कोळीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.मोर्चात प्रभाकर आप्पा सोनवणे, सुभाष सोनवणे, अविनाश तायडे, कुदनभाऊ सोनवणे, नितीन सपकाळे, संदिपभैया सोनवणे, रोहीदास कोळी, भागवत कोळी, कैलास सपकाळे, संतोष सोनवणे, महेंद्र सपकाळे, भरत कोळी, गोकुळ कोळी, अनिल कोळी, सुरज कोळी, राहुल कोळी, विजय कोळी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.