किनगाव खुर्द येथे चोपडा आमदारांच्या प्रा. चंद्रकात सोनवणे यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारत बांधकामाचे भूमिपूजन..

यावल ( प्रतिनिधी ) : तालुक्यातील किनगाव खुर्द येथील ग्रामपंचायत च्या नवीन इमारतीचे भूमिपूजन चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गावात उभारण्यात आलेले बौद्ध विहाराचे तसेच गावात ठिकठिकाणी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण देखील आमदार प्रा . सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गावात आलेल्या आमदारांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेत करण्यात आलेल्या रंगरंगोटीसह विविध कामांची पाहणी आणि विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत त्यांच्याशी हितगुज केले.
किनगाव खुर्द ता.यावल या गावात चोपडा आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीच्या नवीन इमारती करिता २५ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नवीन इमारतीचे कामास लवकरच सुरू होणार असून या कामाचे भूमिपूजन चोपडा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बबलू कोळी, किनगाव खुर्द सरपंच रूपाली कोळी, उपसरपंच रियाज तडवी, ग्रामपंचायत सदस्य साजिद शहा, राहुल साळुंखे, वैशाली संजय पाटील, कल्पना रतन वानखेडे, ताहेर तडवी यांची उपस्थिती होती. दरम्यान या कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर गावात आमदार प्रा. सोनवणे यांच्या निधीतून २० लाख रुपयात उभारण्यात आलेले बौद्ध विहाराचे देखील लोकार्पण करण्यात आले. गावातील नव्याने उभारलेल्या या बौद्ध विहाराच्या लोकार्पण प्रसंगी समाज बांधवांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. त्याचप्रमाणे किनगाव गावात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विविध चौक, मोक्याचे ठिकाण, संवेदनशील परिसरात ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात तब्बल १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तेव्हा या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण देखील आमदार प्रा.सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बाळू पाटील, शांताराम कोळी, रामराव पाटील, संजय महाजन, जगदीश कोळी, संजय कोळी, निळकंठ पाटील, सुरेश तायडे, रवींद्र सपकाळे, नवल कोळी, अशोक कोळी, पिना कोळी मिलिंद कोळी,रतन वानखेडे, ग्रामसेविका सोनाली सोनवणे, संतोष तायडे, प्रकाश वाणी,उमेद महिला बचत गट व संत रविदास महाराज महिला बहुउद्देशीय बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांशी हितगुज या प्रसंगी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी किनगाव गावातील जिल्हा परिषद उर्दू शाळेला देखील भेट दिली व तेथे देखभाल दुरुस्तीचे जे काम झाले होते ते व्यवस्थित झाले आहे किंवा नाही तसेच येथे करण्यात आलेली रंगरंगोटी याची पाहणी त्यांनी केली. तसेच येथील विद्यार्थ्यांशी त्यांनी हितगुज करत शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणी शैक्षणिक अडचणी ज्या काही असतील त्या आपण सोडवण्यासाठी त्यांना प्रथम प्राधान्य देऊ असे देखील आमदारांनी सांगितले.-