पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा भडगाव तालुक्यातील उबाठा गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांचा वाढदिवसाचा उत्साह शमत नाही तोच त्यांना मोठा धक्का बसला असून दत्त जयंतीचे औचित्य साधत नगरपालिकेचे सलग तीन वेळा नगरसेवक व विविध समित्यांचे माजी सभापती पद भूषविलेले दत्तात्रय जडे तसेच युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख जितेंद्र जैन यांनी आमदार किशोर पाटील यांचेवर विश्वास ठेवत शिंदेंच्या शिवसेनेत पुर्नप्रवेश केला आहे. आगमी काळात पक्ष बळकटी साठी आपला प्रयत्न राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रवेश सोहळ्यानंतर दिली आहे.
आमदार किशोर पाटील यांच्या पाचोरा शहरातील ‘शिवालय’ संपर्क कार्यालयात मंगळवारी दुपारी झालेल्या प्रवेश सोहळ्याला जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील, उपसभापती पी ए पाटील, भडगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दोघे ही कट्टर शिवसैनिक असून दरम्यानच्या काळातील काही गैरसमजातून ते दुरावले होते मात्र त्यांचा पुर्नप्रवेश निश्चितच आनंददायी असून त्यांना योग्य वेळी योग्य ती जबादारी देऊन त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल असे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण ब्राह्मणे यांनी मानले .