
पाचोरा : शासकीय दरापेक्षा जादा पैसे घेऊन नागरिकांची लूट करणाऱ्या स्टॅम्प वेंडरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर ५० रुपये अतिरिक्त दर लावून अखेर ५०० रुपयांची लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश ईश्वरलाल संघवी (व्यवसाय – स्टॅम्प वेंडर) आणि त्यांचा भाऊ प्रशांत ईश्वरलाल संघवी यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार १५ मार्च २०२६ रोजी पाचोरा येथील जामनेर-पाचोरा रोडवरील “प्रशांत झेरॉक्स” येथे ५०० रुपयांचे १० स्टॅम्प खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी प्रत्येक स्टॅम्पसाठी ५०० रुपयांऐवजी ५५० रुपये मागण्यात आले.
तक्रारदाराने याबाबत विचारणा केली असता, “५५० रुपयेच लागतील, कमी होणार नाही,” असे ठामपणे सांगण्यात आले. यामुळे शासकीय दरापेक्षा जादा रक्कम मागितली जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.
१७ मार्च २०२६ रोजी सापळा रचून पडताळणी करण्यात आली. यावेळी पंचासमक्ष आरोपी योगेश संघवी यांनी ५०० रुपयांच्या १० स्टॅम्पसाठी ५,००० रुपयांऐवजी ५,५०० रुपयांची मागणी केली. तसेच त्यांचे भाऊ प्रशांत संघवी यांनीही या व्यवहारात सहभाग घेत अतिरिक्त ५०० रुपये लाच स्वीकारली.दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस कर्मचारी बाळू मराठे, भूषण पाटील यांनी केली.