गैरप्रकार खपवून घेणार नाही आरोग्य कर्मचाऱ्यांना उपमहापौरांचा इशारा..

जळगाव– उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी शुक्रवारी मनपाच्या आरोग्य विभागाच्या सर्व मुख्य आरोग्य निरिक्षक, युनिट प्रमुख, स्वच्छता निरिक्षक इत्यादी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कामात सुधारणा करण्याचे तसेच कामात कोठलेही गैरप्रकार होत असल्यास ते त्वरित थांबवण्याच्या सुचना दिल्या.
17 वा माळा येथील उपमहापौर दालनात ही सभा आयोजित करण्यात आलेली होती. जळगाव शहर आपल्याला स्वच्छ व सुंदर करायचे आहे. शहराच्या सर्व भागात घंटागाडी नियमित फिरली पाहीजे, रस्ते गटारी यांच्या नियमित स्वच्छतेसह, शहरातील कचरा वेळच्या वेळी उचलला गेला पाहिजे अशी अपेक्षा उपमहापौरांनी यावेळी व्यक्त केली कर्मचाऱ्यांकडून नेमलेली कामे करुन घ्यावी, काम न करणाऱ्या वा सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालू नये. हजेरी मुकादम यांनी न घेता ती स्वच्छता निरिक्षक यांनी घ्यावी, कामगारांची बोगस हजेरी लागणार नाही, मक्तेदाराकडून अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना उपमहापौरांनी सभेत दिल्या.
स्वच्छता कामकाजात नियमभंग, चुकीची हजेरी, खोटी माहिती किंवा हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही. यापुढे अशा प्रकारची बाब आढळल्यास कडक भूमिका घेतली जाईल, असा इशाराही उपमहापौर यांनी सभेत दिला.