1 हजारांची लाच : भुसावळ भूमीअभिलेख च्या शिपायासह सायबर कॅफे चालक ACB च्या जाळ्यात..

जळगाव : शेतजमिनीच्या मोजणी प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करून देण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई आणि एका खासगी सायबर कॅफे चालकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. सचिन किसन पाटील आणि राकेश रामदास चव्हाण अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
ऑनलाइन मोजणी अर्जानंतर त्रुटींचा मेसेज
या प्रकरणातील तक्रारदाराची भुसावळ तालुक्यातील मौजे गोजोरे शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीच्या मोजणीसाठी तक्रारदाराने ५ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ येथील चव्हाण सायबर कॅफेमधून ऑनलाइन अर्ज केला होता. त्यासाठी आवश्यक असलेले दोन हजार रुपयांचे चलनही भरले होते. मात्र, ३० सप्टेंबर रोजी त्यांच्या मोजणी अर्जामध्ये त्रुटी असल्याचा संदेश प्राप्त झाला. याबाबत तक्रारदाराने सायबर कॅफे चालक राकेश चव्हाण याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन पाटील यांच्याशी चर्चा झाली असून काम पूर्ण होईल, असे त्याने सांगितले.
दरम्यान, १६ ऑक्टोबर रोजी राकेश चव्हाण याने तक्रारदाराला फोन करून मोजणी प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी शिपाई सचिन पाटील यांच्यासाठी एक हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत लाचेच्या मागणीची पुष्टी झाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
शुक्रवारी दुपारी १ वाजून ३२ मिनिटांनी जामनेर रोडकडून हनुमान नगराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नेहते हॉस्पिटलजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी सायबर कॅफे चालक राकेश चव्हाण याने शिपाई सचिन पाटील याच्यासाठी तक्रारदाराकडून 1 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.