भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीआधी मोठा फेरबदल होणार?
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी आता कायम राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवावर आपल्याला सरकारमधून पदमुक्त करण्याची मागणी भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे केली होती. पण त्यांची ही मागणी पक्षश्रेष्ठींनी मान्य केलेली नाही. विशेष म्हणजे दिल्लीत आज भाजपच्या महाराष्ट्रातील कोअर कमिटीची केंद्रातील भाजपच्या दिग्गज नेत्यांसोबत जी बैठक झाली त्यामध्ये याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना पद न सोडण्याचे आदेशच हायकमांडने दिले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना दिलेल्या उत्तरामुळे ते अधोरेखित झालं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत भाजपची बैठक पार पडली. संघटनमंत्री बीएल संतोष, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, महाराष्ट्र विधानसभा भाजप प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजप मुख्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पियूष गोयल, मुंबई भाजपध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील बैठकीला उपस्थित होते. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बैठकीला उपस्थित नव्हते. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि पीयूष गोयल माध्यमांसमोर आले. त्यांनी बैठकीत काय चर्चा झाली या विषयी थोडक्यात माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“भाजपच्या महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची बैठक ही केंद्रीय नेतृत्वासोबत झाली. नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कुठली मतं कशी मिळाली, कुठे चांगली मते मिळाली, कुठे कमी मिळाली, त्याची कारणे काय-काय होती, त्यावर काय-काय मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता, अशा सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली. त्याचसोबत येत्या विधानसभेचा रोडमॅप यावरही आम्ही प्राथमिक चर्चा केली. कुठल्याही परिस्थितीत आपल्या महायुतीच्या सर्व घटकपक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून आणता येईल, या संदर्भात आम्ही एक रोडमॅप तयार केला आहे. याचसोबत आता लवकरच घटक पक्षांसोबत चर्चा करुन अत्यंत मजबुतीनं आपल्याला निवडणुकीत कसं पुढे जाता येईल, याबाबतची सर्व कारवाई आम्ही येत्या काळात करणार आहोत”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय
ईतर महत्वाच्या बातम्या
चाळीसगाव मध्ये 10 लाखाचा गांजा जप्त : चाळीसगाव पोलिसांची कारवाई..