निंभोरा स्टेशन जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य..
ग्रा.पं.प्रशासन सुस्त विद्यार्थी त्रस्त...
रावेर/प्रतिनिधी – दि.25 विनायक जहुरे
रावेर तालुक्यातील निंभोरा बु! येथील स्टेशन परिसरातील जिल्हा परिषद शाळा घाणीच्या विळख्यात. सविस्तर वृत्त असे की सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने लहान बालकांना जाण्या येण्यासाठी चिखल तुडवत जावे लागत आहे.
शाळेसमोरील प्रवेशद्वारा समोर रस्त्यावर ग्रामपंचायत ने पाईपलाईन साठी केलेली चारी खोदकाम ही न बूजता अशीच पडून राहिल्याने चिखल माजला आहे तसेच शाळेच्या प्रांगणात नव्याने बांधलेल्या शौचालय व पाण्याच्या टाकीसाठी जवळ काळी माती पडली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यातून बिकट वाट काढून कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर शौचालय व पाण्याच्या टाकीला अजून पर्यंत ही नळ जोडणी केलेली नाही.
शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार देऊनही दुर्लक्ष होत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळेच्या भिंतीला लागून कचरा टाकला जात असून त्यामुळेही लहान बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली आहे यासंदर्भात येथील रहिवाशांनी रोष व्यक्त करताना स्टेशन परिसराचा ग्रामपंचायतेने विकास कामा बाबत विचार करण्यात येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.